गौरी टेंबकर, मुंबई: वांद्रे पश्चिम परिसरात एका श्रवण उपचार तज्ज्ञ ( इएनटी स्पेशालिस्ट) ला टास्क जॉबचा गंडा घालत लाखोंची फसवणूक करण्यात आली. या विरोधात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार डॉ जेनल रोड्रिक्स (४१) हे डॉक्टर जे पीटर ऍड्रेस इएनटी क्लिनिकमध्ये काम करतात. त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ६ जून रोजी मेसेज आला. ज्यात त्यांची कॉइन डीसीएक्स एक्सचेंज डिजिटल मार्केटिंग कंपनी असून त्याचे गुगलवर रिव्ह्यू लिहून टास्क करायचे. ते प्रत्येक टास्क पूर्ण केल्यावर तुम्हाला १ हजार ते ८ हजार रुपये मिळतील असेही सांगण्यात आले. त्यावर तक्रारदाराने मेसेजला रिप्लाय केल्यावर त्यांना चार जणांचा सहभाग असलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हायला सांगण्यात आले. डॉक्टरने सुरुवातीला ज्या दोन टास्क पूर्ण केल्या त्यासाठी त्यांना १५०० आणि ४३०० रुपये मिळाले. मात्र तिसऱ्या टास्कच्या वेळी दोघांच्या ग्रुपपैकी एकाने चूक केल्याने तिसऱ्या टास्कच्या ७ हजार रुपयांसाठी त्यांना २९ हजार ८८६ रुपये भरायला सांगितले. हे पैसे त्यांना रिवार्ड सोबत मिळतील असे सांगण्यात आल्याने डॉक्टरने यूपीआय मार्फत सदर रक्कम पाठवली.
मात्र, नंतर ती रक्कम फ्रीज झाल्याचे सांगत ती अनफ्रिज करण्यासाठी १ लाख ८ हजाराची पुन्हा मागणी करण्यात आली. ते पैसेही तक्रारदाराने तीन वेगवेगळ्या व्यवहारात यूपीआय मार्फत पाठवले. असेच करत वेगवेगळी कारणे सांगत तक्रारदाराकडून त्यांनी २ लाख ४१ हजार ४४८ रुपये उकळत त्यांची फसवणूक केली. संशय आल्यावर त्यांनी पैसे भरायला नकार दिला आणि याविरोधात पोलिसात धाव घेतली.