Join us  

अमिश त्रिपाठींशी दिलखुलास गप्पा; सेंट झेवियर्सच्या 'मल्हार'मध्ये रंगले किस्से, विद्यार्थी खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:16 PM

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या भव्य फेस्ट 'मल्हार'ला आता अंतिम टप्प्यात आला आहे.

मुंबई: सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या भव्य फेस्ट 'मल्हार'ला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या फेस्टिव्हलमधील बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमांपैकी एक विशेष कार्यक्रम म्हणजे, 'फॉर द प्लॉट'च्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्यासोबत संवाद. कार्यक्रमाची सुरुवात ही लेखकांची ओळख करून झाली. आजवर अमिश यांची ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांच्या लेखणीला सात मिलियनहून अधिक वाचकांचे प्रेम लाभले आहे. खरं तर अमिश हे सेंत झेवियर्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी इथून बीएससी (गणित) यात पदवी प्राप्त केलेली आहे. याहून विशेष म्हणजे विद्यार्थी जीवनात त्यांना 'मल्हार'चे चेअरपर्सन म्हणून कार्यभार देखील सांभाळण्याची संधी प्राप्त झाली होती. विशेष गोष्ट अशी आहे की अमिश मल्हार १९९४ चे मुख्य अध्यक्षही होते. 

सर्वप्रथम एक मुलाखत घेण्यात आली, ज्यात अमिश यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जाणून घेता आले. त्यांचे लेखन क्षेत्रातले पदार्पण आणि कॉलेजनंतरचा पुढील प्रवास त्यांनी अगदी मनमोकळ्या पद्धतीने मांडला. यानंतर एक रॅपिड फायर राउंड आणि कॉलेजसंबंधी एका प्रश्नमंजुषेचा भाग म्हणून त्यांनी काही गमतीदार किस्से सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील त्यांनी उदाहरणासहित उत्तरे दिली. 

या चर्चेत त्यांनी स्पष्टपणे पुरातन भारत काळातील विचारसरणी आणि आजची विचारसरणी, तसेच पाश्चात्य देशांतील संस्कृती आणि विचारधारा याबद्दल काही मुद्दे मांडले. भारतीय हे समाज म्हणून सर्वसमावेशक असल्याचं त्यांनी गर्वाने आणि विश्वासाने सांगितलं. त्यांच्या मते, गोष्टींना फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात पाहणे ही हल्लीची परंपरा आहे. परंतु, आपले पूर्वज हे फार वेगळ्या दृष्टीने गोष्टींकडे पहायचे. त्यांना यातील सर्व छटा दिसायच्या. ते जे काही, जसे काही होते तसे त्या गोष्टी पहायचे. “अशा कथा लिहिण्यासाठी खरं तर भारतासारखाच देश सर्वोत्तम आहे कारण आपण खुल्या मनाचे आहोत आणि विविध दृष्टिकोनातून आकलन करण्याची आपली क्षमता आहे, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

ह्या अर्थपूर्ण संवादाने विद्यार्थ्यांना एक नवीन उमेद दिली. लवकरच येणाऱ्या पुस्तकाबद्दल त्यांनी माहिती दिली, तेव्हा वाचक भलतेच खूश झाले. हे नवीन पुस्तक 'राजेंद्र चोला' जे तमिळनाडू राज्यातील सम्राट होते त्यांच्यावर आधारित आहे. या व्यतिरिक्त अमिश लवकरच एक नवीन पॉडकास्ट घेऊन येणार आहेत. अशा या गप्पांनंतर वाचकांनी त्यांच्या घरून जी पुस्तके आणली होती त्यावर अमिश यांनी स्वाक्षऱ्या दिल्या.

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थी