Join us

मुंबईकरांना बसताहेत ऑगस्टमध्येच चटके; रविवारनंतरच मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:05 AM

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईच्या उकाड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईच्या उकाड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३१ ते ३२ अंशांवर पोहोचले असून आणखी दोन-तीन दिवस असेच वातावरण राहील आणि २५ ऑगस्टनंतर मात्र पाऊल पडेल, असा  हवामान खात्याचा अंदाज आहे.  

जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस कोसळला. विशेषतः जुलैच्या सुरुवातीला आणि अखेरीस पडलेल्या पावसाने मुंबईकरांची पाण्याची चिंता कमी केली. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. १५ ऑगस्टनंतर पाऊस थांबल्याने मुंबईच्या तापमानात वाढ झाली.

दोन दिवसांपूर्वी श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ मुंबईकरांनी अनुभवला, पण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि उन्हाचे चटके बसू लागले. आता तर कमाल तापमानात वाढ होऊन ते ३२ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. स्वाभाविकपणे मुंबईकर ऐन पावसाळ्यात घामाच्या धारांनी निथळत आहेत. दरम्यान, ऑगस्टनंतर आता सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वसाधारण पावसाची नोंद होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

पाऊस थांबल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. आणखी दोन दिवस उकाडा कायम राहील आणि २५ ऑगस्टपासून पाऊस पुनरागमन करेल. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग 

अंदाज असा.... 

१) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.

२) दक्षिण कोकण आणि उत्तर- मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता. 

३) विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावासाची शक्यता.

टॅग्स :मुंबईतापमानहवामान