लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई शहराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात मालाड, आरे कॉलनी, गोरेगाव, वांद्रे आणि सांताक्रूझमध्ये पावसाने गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दमदार बॅटिंग करत पावसाची अधिक नोंद केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला पट्ट्यातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिला. पूर्व उपनगरात सायनपासून कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विद्याविहार, घाटकोपर, देवनार, चेंबूरसह लगतच्या परिसरात दाटून येणारे काळेकुट्ट ढग परिसराला अधूनमधून चांगलेच झोडपून काढताना दिसले. पश्चिम उपनगरात दहीसर, बोरिवली पट्ट्यात हाच ट्रेंड पाहायला मिळाला. त्यात सकाळी १० वाजता मुंबई शहरात पावसाने विश्रांती घेतली असताना वांद्रे-कुर्ला, कुर्ला पट्ट्यात मात्र पावसाने जमके बरसात केली. सकाळी ११ नंतर विश्रांतीवर गेलेला पाऊस दुपारी १२ नंतर पुन्हा जोरदार कोसळू लागला. दुपारी २ वाजेपर्यंत पावसाने बीकेसीसह लगतच्या परिसरात चांगलीच हजेरी लावली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे. आता पालघरच्या वरील भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पालघर, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या परिसरात पाऊस पडतो आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि २७ सप्टेंबरपर्यंत मुंबईच्या पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक