लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पश्चिमेकडून मुंबईकडे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, पुन्हा एकदा पावसाने मुंबईत श्रीगणेशा केला आहे. त्यानुसार, शहरासह उपनगरात सोमवारी दुपारी पावसाने दमदार आगमन केले असून, मंगळवारीही मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. हवामानातील चढत्या - उतरत्या आर्द्रतेमुळे मुंबईतला उकाडा वाढला होता. मुंबईकर ऐन पावसाळ्यात उकाड्याने हैराण झाले असतानाच सोमवारी सकाळपासूनच मुंबईवर ढगांनी गर्दी केली.
दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत दाटून आलेला काळोख आणखी घट्ट होत असतानाच दुपारी तीन दरम्यान सायन, बीकेसी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकीनाका परिसरात पाऊस झाला. अर्ध्या तासात पावसाचा जोर कमी झाला. मुंबई शहरात वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ आणि लगतच्या परिसरात हलक्या सरी कोसळल्या.
आज काय?
१) मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० आणि २७ च्या आसपास राहील.
२) कोकणातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३) उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
४) दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
५) विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून ते दीड किमी उंचीपर्यंत ताशी ४८ किमी वेगाने आर्द्रतायुक्त पश्चिमी वारे मुंबई किनारपट्टीवर आदळत आहेत. त्यामुळे मुंबईत पाऊस पडत आहे. शिवाय मान्सूनचा मुख्य आस दक्षिणेकडे आहे. गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्रात किनारपट्टी समांतर ऑफ शोअर ट्रफ आहे.- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ