हिंदमाता, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; पाणी न साचण्यासाठी पालिका करणार प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 10:00 AM2024-07-09T10:00:14+5:302024-07-09T10:03:32+5:30

पावसात पाणी साचणार नाही, असे कितीही दावे प्रशासनाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर हे दावे फोल ठरतात.

in mumbai hindmata and andheri subway under water again the municipality will try to prevent water accumulation | हिंदमाता, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; पाणी न साचण्यासाठी पालिका करणार प्रयत्न

हिंदमाता, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; पाणी न साचण्यासाठी पालिका करणार प्रयत्न

मुंबई : पावसात पाणी साचणार नाही, असे कितीही दावे प्रशासनाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर हे दावे फोल ठरतात. पाणी भरू नये म्हणून केलेल्या उपायांची यादी यंत्रणांकडून दिली जात असली तरी यंदाही पहिल्याच मुसळधार पावसाने हिंदमाता, मिलन सब-वे, शीव येथील गांधी मंडई, अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला. विशेष म्हणजे भूमिगत टाकी बांधली असतानाही हिंदमाता परिसरात पाणी भरले.

दरम्यान, सोमवारी ज्या भागांत पाणी साचले, त्या ठिकाणांचा पालिका अभ्यास करेल आणि पुढच्या वेळी पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना हाती घेईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. गेल्या २४ तासात ११० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद एफ पर्जन्यमापक यंत्रावर झाली.

१) गांधी मार्केटमध्ये पाणी साचल्याने उत्तरेकडे जाणाऱ्या किंग सर्कल फ्लायओव्हरवर वाहतूक संथ.

२) इन्कम टॅक्स ऑफिस येथे पावसाचे पाणी साचल्याने बीकेसी कनेक्टरकडे जाणारी वाहतूक संथ.

३) कारच्या बिघाडामुळे वाशी ब्रिज उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ.

४) पाणी साचल्याने अंधेरी सब-वेमधील वाहतूक बंद

सोमवारी दिवसभर अंधेरी सब-वे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद ठेवावी लागली आहे. अंधेरी गोखले पुलाचे काम सुरू असल्यामुळे अंधेरीतील मोगरा नाला रुंदीकरणाचे काम दोन वर्षे हाती घेता आलेले नाही. मोगरा नाल्यात मलनिःसारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळा नसतानाही वाहत असतो. त्यामुळे ताशी केवळ २० मि.मी. पाऊस पडला तरी या परिसरात पाणी भरते.

वाहतूक संथ गतीने-

१) वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला. वाहतुकीचा मार्ग एस. व्ही. रोडकडे वळवला.

२) इलेक्ट्रिक बसच्या बिघाडामुळे हंसमोगरा जंक्शन दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ.

३) कारच्या बिघाडामुळे सी लिंक गेटउत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने.

४) अंधेरी (पू), साकीनाका वाहतूक विभागातील साकीनाका मेट्रो स्थानक पेनिन्सुला जंक्शन ते टिळक नगरपर्यंत वाहतूक संथ.

५) कारच्या बिघाडामुळे हंसबुगरा जंक्शन उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने.

कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार...

१) पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पालिकेला यश आलेले नाही. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले.

२) शहर भागात पावसाचा जोर कमी होता, मात्र तरीही हिंदमाता आणि शीव येथील गांधी मंडई परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे गांधी मंडई परिसरातील वाहतूक वळवावी लागली.

३) हिंदमाता भागाची पाणी तुंबण्यापासून सुटका व्हावी यासाठी तेथे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग केला होता. उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने.

४) हिंदमाता परिसरातील भूमिगत टाक्यांची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर पाणी साचू शकते. १५ जूनला या परिसरात ताशी १२६ मि.मी. पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात २४ तासात ११० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद एफ दक्षिण कार्यालयाच्या पर्जन्यमापक यंत्रावर झाली.

Web Title: in mumbai hindmata and andheri subway under water again the municipality will try to prevent water accumulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.