गिरगावच्या शोभायात्रेत मांगल्याची गुढी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:45 AM2024-04-10T09:45:07+5:302024-04-10T09:46:19+5:30
उत्साहात, मंगलमय वातावरणात गिरगाव येथील नववर्ष स्वागत यात्रात मंगळवारी पार पडली.
मुंबई : एकीकडे सकाळपासूनच नऊवारी साडी, नाकात नथ, गळ्यात विविध माळा, कपाळ्यावर चंद्रकोर असलेली टिकली, असा साजशृंगार करून आलेल्या महिला, तर कुर्ता, गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोक्यावर फेटा परिधान केलेले पुरुष, विविध वेशभूषा केलेले मुले-मुली, तर दुसरीकडे ढोल-ताशांचा गजर, मलखांब या सारख्या चित्तथरारक कसरती, तसेच बघ्यांची झालेली तोबा गर्दी, अशा उत्साहात, मंगलमय वातावरणात गिरगाव येथील नववर्ष स्वागत यात्रात मंगळवारी पार पडली.
मागील २२ वर्षांपासून गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्यनिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जाते. त्यात ते दरवर्षी सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना सहभागी होण्याचे आवाहन करतात. त्यासोबत शिवसेवा प्रतिष्ठानने सुद्धा यावेळी गिरगावात शोभायात्रेचे आयोजन केले होते. या दोन शोभायात्रांचे केंद्रबिंदू गिरगाव असल्यामुळे संपूर्ण गिरगावात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी काही रस्ते बंद केले होते.
या सोहळ्यात लाठीकाठी, मल्लखांब प्रात्यक्षिके वैशिष्ट्यपूर्ण ठरले. गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि १०० टक्के मतदान जनजागृतीवरील देखावा त्या सोबत विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या प्रतिकृती मोठ्या वाहनांवर ठेवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. तरुणाईचा जल्लोष इतका मुंबईच्या विविध भागांतून जत्थे या मिरवणुकीत सहभागी
झाले होते.
गेले अनेक वर्षे काढत असलेल्या शोभायात्रेत तरुणांची गर्दी वाढतच आहे. शिवराज्य हेच रामराज्य ही या वर्षीची संकल्पना होती. सकाळी फडके मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेचा समारोप दुपारी प्रिन्सेस स्ट्रीटवर सिद्धिविनायक दर्शन सोहळ्याने झाला. अभिनेत्या निशिगंधा वाड तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्ती या यात्रेत सहभागी झाले होते. आमच्याकडे सर्वच सामाजिक संस्थांना आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. - योगेश प्रभू, माजी अध्यक्ष, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, गिरगाव
महिलांची बुलेटस्वारी-
दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पेहरावात महिला दुचाकीवर स्वार झाल्या होत्या. विशेष म्हणजे काही महिला या बुलेटवर आल्या होत्या. त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रत्येक महिला इतक्या गर्दीतही आपली वाहने व्यवस्थित चालवत या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
सेल्फीची क्रेझ आणि धूम-
शोभायात्रेत सहभागी झालेले अनेक तरुण सेल्फी काढत असल्याचे दिसून आले. तर, काहीजण तू माझा फोटो काढ, मी तुझा काढत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत होते. अनके हौशी फोटोग्राफर आपले प्रोफेशल कॅमेराचा वापर करून हा सर्व सोहळा टिपण्यात दंग होते.
१) चर्नीरोड रेल्वे स्टेशनला जत्रेचे स्वरूप आले होते. स्टेशनच्या एका पुलावर तरुणाई केवळ फोटो काढण्यासाठी पोझ देत असल्याने पूर्ण पूल त्यांनीच व्यापला होता.
२) सध्याचा काळ लोकसभा निवडणुकीचा असल्याने राजकीय पक्षांनी थेट शोभायात्रा काढल्या नसल्या तरी संघटनांच्या शोभायात्रांत मात्र नेत्यांनी हजेरी लावली होती. गिरगावमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते.