Join us  

मुंबईतल्या घरांचे आकारमान वाढले, ५ टक्क्यांनी वाढ; अन्य शहरांच्या तुलनेत घरे छोटेखानीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:14 AM

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ॲनारॉक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकीकडे गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह महामुंबई परिसरातील (एमएमआर) घरांच्या विक्रीने उच्चांक गाठलेला असतानाच आता मुंबई व एमएमआर परिसरातील घरांच्या किमान आकारमानात पाच टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ॲनारॉक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. या सर्वेक्षणानुसार, २०१९ ते २०२४ या कालावधीमध्ये एमएमआर परिसरातील घरांच्या आकारमानात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

२०१९ मध्ये एमएमआर परिसरातील घरांचे किमान आकारमान ७८४ चौरस फूट होते. यामध्ये वाढ होत आता २०२४ मध्ये घरांचे किमान आकारमान ८२५ चौरस फूट झाले आहे. घराच्या आकारमानात वाढ होण्याची सुरुवात ही २०२० पासून झाल्याचे दिसून येते. एमएमआर परिसर वगळता मुंबई शहरात आजच्या घडीला वाढीला मर्यादा आहेत. मात्र, लोकांचा घर खरेदी करण्याचा कल जोमात असल्यामुळे किमान आकारमानात वाढ करत अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याच्या योजना विकासक राबवीत असल्याचे दिसून येत आहे.

हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर-

१) मुंबई व एमएमआरमध्ये जरी घराचे आकारमान वाढण्यास पाच वर्षे लागली असली तरी, देशातील अन्य शहरांत मात्र घरांच्या आकारमानात लक्षणीय वाढ झाली आहे. 

२) दिल्ली-एनसीआरमध्ये ही वाढ सर्वाधिक असून, तेथील घरांचे किमान आकारमान २४५० चौरस फुटांवर पोहोचले आहे, तर या यादीत हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथील घरांचे किमान आकारमान २०१० चौरस फूट असल्याचे दिसून आले आहे. 

३) कोलकाता शहर तिसऱ्या क्रमांकावर असून येथील किमान आकारमान ११२५ चौरस फूट आहे, तर पुण्यामध्ये किमान ११०३ चौरस फूट आकारमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग