Join us  

कोस्टलच्या २ गर्डरमध्ये उंचीची तफावत कशी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 11:43 AM

गोखले आणि बर्फीवाला पुलांमध्ये निर्माण झालेली उंचीची तफावत आणि त्यावरून झालेला गोंधळाचा धसकाच मुंबईकरांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोखले आणि बर्फीवाला पुलांमध्ये निर्माण झालेली उंचीची तफावत आणि त्यावरून झालेला गोंधळाचा धसकाच मुंबईकरांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कोस्टल रोड व वांद्रे - वरळी सी-लिंकच्या जोडणीदरम्यान दोन गर्डरमधील अंतरामुळे निर्माण झालेली उंचीची तफावत सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. 

वांद्रे - वरळी सी-लिंक आणि कोस्टल रोड सुरू करण्याच्या दिशेने पालिकेचे नियोजन सुरू असून, त्यासाठी दोन्ही बाजूच्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरची जोडणी पूर्ण झाली आहे. त्यावरील सर्फेसिंग व क्युरिंगचे काम सध्या पालिकेकडून सुरू आहे. मात्र, या दोन्ही गर्डरमधील उंचीची तफावत हा चर्चेचा विषय बनला असून, गोखले पुलासारखा अभियांत्रिकी घोळ पुन्हा इथे झाला की काय? असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करू लागले आहेत.

कोस्टल रोडमुळे मारिन ड्राइव्ह ते वरळी हा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर आल्यानंतर आता मुंबईकरांना थेट मारिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवासदेखील काही मिनिटांत करण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, पावसाच्या सरींमुळे या रस्त्यावरील काँक्रीटीकरण आणि क्युरिंगची कामे करण्यात अडथळे येत असल्याने ही कामे लांबणीवर पडली आहेत. रस्त्यांच्या कामातील काँक्रीटचा दर्जा पावसाच्या पाण्याने खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते पूर्णपणे सुकण्यासाठी किमान सलग २४ तासांहून अधिक काळाची आवश्यकता असते. साहजिकच पावसाच्या दिवसांत हे काम पूर्ण होणार नसल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

पालिका काय म्हणते ? 

१) कोस्टल रोड वांद्रे - सी-लिंकला जोडण्यासाठी दोन बो स्ट्रिंग आर्च गार्डरची जोडणी करण्यात आली आहे. एकाची लांबी २७ मीटर तर दुसऱ्याची १७ मीटर आहे. 

२) या गर्डरचे वजन पेलण्यासाठी गर्डरच्या खाली एकीकडे ३ मीटर तर दुसरीकडे साडेतीन मीटर उंचीचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गर्डरच्या उंचीत समानता दिसून येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

३) वांद्रे - वरळी सी-लिंकला मारिन लाइन्सवरून जाणारा रस्ता या गर्डरवरून वक्र होऊन गेला असल्याने तो वर खाली दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते वाहतूक