कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:47 AM2024-07-16T09:47:34+5:302024-07-16T09:50:41+5:30

मुसळधार पाऊस पडतोय आणि आपल्या परिसरात कुठे, किती पाणी भरलंय याचा अंदाज घ्यायचा असेल तर आता आयआयटी मुंबईचे फ्लड ॲप आपल्याला मदत करणार आहे.

in mumbai how much water filled one click to know iit mumbai flood app will help to the rescue  | कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला 

कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला 

मुंबई :  मुसळधार पाऊस पडतोय आणि आपल्या परिसरात कुठे, किती पाणी भरलंय याचा अंदाज घ्यायचा असेल तर आता आयआयटी मुंबईचे फ्लड ॲप आपल्याला मदत करणार आहे. मुंबई पालिका आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेले हे ॲप पावसाळ्यात मुंबईकरांसाठी मदतनीस म्हणून काम करणार आहे. 

या ॲपमध्ये केवळ आपल्या परिसरातील फ्लडिंग स्पॉट्सची माहिती मिळणार नाही तर येत्या ३ दिवसांत हवामान कसे असेल? प्रत्येक तासाला, कुठल्या परिसरात किती पाऊस झाला याची इत्थंभूत माहितीही देणार आहे. आपण आहोत त्या परिसरातीलच नाही तर दुसऱ्या परिसरात पाण्याची पातळी कुठे, किती आहे हेसुद्धा यातून कळणार आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे हे ॲप सोमवारपासून मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईच्या क्लायमेट स्टडीज, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्री अभ्यासक्रमाच्या मुलांनी एकत्र येत हे ॲप तयार केले आहे. त्यासाठी त्यांना एचई-आयआयटीबी इनोव्हेशन सेंटरने मदत केली. प्रा. रघू मुर्तुगुड्डे आणि डॉ. सुबिमल घोष यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   

विशेष म्हणजे हे ॲप वेब पोर्टलच्या माध्यमातही उपलब्ध आहे. पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी क्लायमेट स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी विशेष मॉडेल तयार केले आहे. त्याशिवाय मिठी नदी, वाकोला नाला अशा ठिकाणी बसवलेल्या सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची पातळीही कळणार आहे. तसेच या ॲपमध्ये नागरिकही त्यांच्या भागातील माहिती टाकू शकतील.

अँड्रॉईडवर उपलब्ध -

हे ॲप वेब पोर्टल वापरणाऱ्यांना प्रत्यक्ष त्यावेळी स्थानिक हवामान केंद्राजवळ पडणाऱ्या पावसाची माहितीही घेता येईल. तसेच मुंबईच्या पावसाबद्दल व पुराबद्दल सोशल मीडिया ॲपवर आलेले मेसेजही बघता येणार आहेत. त्यासाठी https://mumbaiflood.in/ या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असून ‘मुंबई फ्लड ॲप’ या नावाने डाऊनलोड करता येणार आहे.

Web Title: in mumbai how much water filled one click to know iit mumbai flood app will help to the rescue 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.