मुंबई :मुंबईतलेटॅक्सी आणि रिक्षाचालक सर्रास भाडे नाकारतात. रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही रिक्षा-टॅक्सी चालकांच्या या मुजोरीचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे कोणीही भाडे नाकारत असल्यास त्यांच्याविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
पावसाळा असल्याने लवकर घर गाठण्यासाठी मुंबईकर बस किंवा रेल्वेपेक्षा रिक्षा वा टॅक्सीचा वापर करतात. मात्र, याचा गैरफायदा घेत रिक्षा, टॅक्सीचालक अवाच्यासव्वा भाडे उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर आरटीओकडून कारवाईचा करण्यात येत आहे. मुंबईत अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
रात्रीच्या वेळी अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध असतानाही भाडे नाकारले जाते. अशा चालकांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. पोलिसांनी यापूर्वी टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या बैठका घेऊन त्यांना भाडे नाकारू नका, असे वारंवार बजावले होते आणि याबाबत मार्गदर्शनही केले होते.
...तर जास्तीचे प्रवासी
शेअर रिक्षात अतिरिक्त प्रवासी बसवले जातात. वाहतूक पोलिस मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. आरटीओकडून नावापुरती कारवाई केली जात, अशी तक्रार आहे. अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, मालाड, कांदिवली, सांताक्रूझ, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर घाटकोपरसह विविध ठिकाणी रिक्षाचालक अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांच्या जिवाशी खेळतात.
काय होते कारवाई?
रिक्षा टॅक्सी तपासणी करून जादा भाडे, जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन याप्रकरणी आरटीओकडून कारवाई केली जाते. यामध्ये परवाना निलंबन केला जातो, तसेच दंडही आकारला जातो.