जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव; मनपाचा थकबाकीदारांना दणका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:09 AM2024-05-11T10:09:53+5:302024-05-11T10:12:06+5:30

१५ दिवसांत ५९५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य.

in mumbai if the tax is not paid even after confiscation the properties will be auctioned bmc warn to tax payers | जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव; मनपाचा थकबाकीदारांना दणका 

जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव; मनपाचा थकबाकीदारांना दणका 

मुंबई : वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरलेल्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात. त्यानंतरही त्यांनी कर न भरल्यास जप्त केलेल्या वस्तूंची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावी, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. 

नागरिकांनी वेळेत हा कर भरावा, यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात शुक्रवारी पालिकेत गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी सूचना दिल्या. यंदा पालिकेने चार हजार ५०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गुरुवारपर्यंत तीन हजार ९०५ कोटी रुपयांचा कर संकलित झाला असून, येत्या  १५ दिवसांत ५९५ कोटी रुपये कर संकलनाचे लक्ष्य आहे. 

मुदतीत कर भरून पालिकेला सहकार्य करा-

१) शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करावे, तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

२) याशिवाय मुंबईकरांनीही मुदतीत मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

करवाढीचा नवीन स्रोत-
 
करवाढीचा नवीन स्रोत शोधण्यासाठी २४ विभागांतील मालमत्तांचे स्थळ निरीक्षण करून त्यातील बदलानुसार करनिर्धारणात सुधारणा करावी, अशा सूचनाही आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

१) सातत्याने पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन  मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. 

२) ‘पी उत्तर’ विभागातील दोन भूखंड आणि ‘एफ उत्तर’ विभागातील एका भूखंडाचा त्यात समावेश आहे. 

३) या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण सहा कोटी ७३ लाख २० हजार ९३१ हजार रुपयांची कर थकबाकी आहे. 

४) यामध्ये ‘पी उत्तर’ विभागात कुरार गावातील मालाड येथील एसजीएफ एंटरप्रायजेसकडे तीन कोटी ११ लाख ५८ हजार ९८९ रुपयांची थकबाकी आहे, तर मालाड येथील राणी सती मार्ग येथील राधा कन्स्ट्रक्शन प्रा.लिमिटेडकडे दोन कोटी ५४ लाख पाच हजार ७३७  रुपयांची थकबाकी आहे. 

५)  ‘एफ उत्तर’ विभागातील वडाळा येथील कपूर मोटर्स यांच्या व्यावसायिक भूखंडावरही कारवाई करण्यात आली आहे. 

६) त्यांच्याकडे एकूण एक कोटी सात लाख ५६ हजार २०५ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. 

७) या थकबाकीदार मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

Web Title: in mumbai if the tax is not paid even after confiscation the properties will be auctioned bmc warn to tax payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.