Join us  

पालिका रुग्णालयांत अस्वच्छता दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:36 AM

स्वच्छतेची सेवा पुरविण्यात जे कंत्राटदार कुचराई करत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. 

मुंबई : महापालिका रुग्णालयांत प्रसाधनगृहाच्या ठिकाणी गर्दीच्या वेळेत सातत्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. अस्वच्छतेमुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही तसेच रुग्णालय परिसराची स्वच्छता असावी, याची दक्षता रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक यांनी घ्यावी. तसेच स्वच्छतेची सेवा पुरविण्यात जे कंत्राटदार कुचराई करत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. 

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक बुधवारी मुख्यालयात पार पडली. यावेळी पालिका क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविणारी यंत्रणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सज्ज व अधिक सतर्क ठेवा, रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णसेवा, औषध पुरवठा, प्रसाधनगृहे आदी सुविधा काटेकोरपणे पुरविण्याचे निर्देशही बांगर यांनी दिले आहेत. 

उपचारासाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा’-

१) ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, मुले यांंना रुग्णालयातील विविध टप्प्यांत लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी नियोजन करावे.

२) रुग्णांना केस पेपर, ओपीडी, एक्स रे, सोनोग्राफी आणि औषध घेण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

३) या सुविधांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ‘टोकन पद्धती’ सारख्या उपाययोजनांची शक्यता पडताळून पाहावी.

४) उपचारासाठी आलेल्या रुग्णांना पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

५) रुग्ण आणि रुग्णांसोबत येणारे नातेवाईक यासोबत कर्मचाऱ्यांची वागणूक नम्र आणि आपुलकीची असावी, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहेत.

सर्व उपकरणांची तपासणी करा-

१) रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा रुग्णालयासंदर्भातील प्रतिसाद नियमितपणे नोंदविणारी यंत्रणा असणे गरजेचे आहे. 

२) या प्रतिसादाच्या आधारे आपण देत असलेल्या वैद्यकीय व आरोग्यविषयक सोयीसुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

३) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता, विद्युत व्यवस्थेची व विद्युत उपकरणांची नियमित तपासणी, अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने नियमित परीक्षण (फायर ऑडिट), प्राणवायू (ऑक्सिजन) संचांची आणि रुग्णालयातील सर्व उपकरणांची नियमित तपासणी करण्यात यावी असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल