लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँक्रिटच्या रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)ची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी संस्थेकडे असेल.
त्यादृष्टीने पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पालिकेच्या वतीने प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांनी तर, संस्थेच्या वतीने अधिष्ठाता (संशोधन व विकास) प्रा. सचिन पटवर्धन यांनी स्वाक्षरी केली.
मुंबईतील ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
आयआयटीच्या नियुक्तीमुळे काँक्रिट रस्त्यांच्या कामात अत्युच्च गुणवत्ता राखली जावी, यासाठी मदत होणार आहे. अधिक गतीने कामे करताना गुणवत्ता ढासळू नये, यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी यासाठी आयआयटी मार्गदर्शन करणार आहे, असे गगराणी यांनी सांगितले. तर, कमी गुणवत्तेचे कामकाज होऊ नये, म्हणून दक्षता, कामाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
अशी असेल जबाबदारी-
कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देणे, त्याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीदरम्यानची निरीक्षणे आणि त्यावरील सल्ला यांबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल. प्लांटमध्ये मटेरियल बनविण्याच्या टप्प्यापासून ते काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच्या विविध चाचण्यांद्वारे तपासणी केली जाईल.
निकष तपासणार-
१) रस्त्यांची देखभाल, पुनर्रचना, पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्यासाठी सल्ला देणे.
२) प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष आवश्यकतेनुसार तपासणे.
३) गुणवत्तेची खात्री करून घेण्यासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे.
४) तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी प्रकल्पस्थळास भेटी देणे, आदीचा संस्थेच्या कामकाजात समावेश आहे.