लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. त्यातच अनेकदा वाहनचालक बेकायदा पार्किंग करत असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. त्याचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसत असून, त्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई महापालिकेने गोरेगाव परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेस्को परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बिनधास्तपणे बेकायदा पार्किंग केले जात आहे. बेस्ट बससह अन्य वाहनांना या पार्किंगचा अडथळा होत आहे. त्याचबरोबर येथील अशोक नगर, संत रविदास महाराज नगर, हनुमान नगर, शिवशक्ती नगर, वनराई काॅलनी व या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक विशेषत: विद्यार्थांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने जोगेश्वरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश गीरमे यांच्याकडे केली आहे.
पोलिसांना निवेदन -
१) याबाबत पक्षाच्या महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष उषा रामलू, उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष रेश्मा खान, तालुका अध्यक्ष रमेश पाईकराव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश गिरमे यांना निवेदन दिले आहे.
२) यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास पक्षातर्फे हब माॅल येथील चौकात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.