Join us  

दुपारी निघाले सुट्टीचे परिपत्रक अन् पालकांची झाली धावपळ; पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 9:48 AM

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुपारी १:३०च्या सुमारास काढले.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुपारी १:३०च्या सुमारास काढले. तोपर्यंत सकाळच्या शाळा सुटल्या होत्या आणि दुपारच्या शाळाही भरल्या होत्या. शाळांनी परिपत्रक मिळताच दुपारच्या सत्रातील शाळा सोडल्या. याबाबतचा निरोप मिळताच मुलांना पुन्हा शाळेत आणायला जाण्यासाठी पालकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या परिपत्रकाचा काय फायदा? असा संतप्त सवाल पालकांनी केला.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुरुवारी अचानक सुट्टी  जाहीर करण्यात आली. दुपारी १:३०च्या सुमारास याबाबतचा निरोप मिळाल्यानंतर पालकांची तारांबळ उडाली. अनेकदा पावसामुळे अचानक सुट्टी  जाहीर केल्यानंतर पालकांचे हाल होतात. पहिली ते चौथीपर्यंतच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शाळेत सोडतात  आणि शाळा सुटल्यावर घरी घेऊन जातात. अचानक सुट्टी जाहीर झाल्यावर  आमची धावाधाव होते, अशी पालकांची तक्रार आहे. बुधवारपासूनच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होता आहे. त्यामुळे या पावसाचा अंदाज घेऊन तरी अगोदरच सुट्टी जाहीर केले तर काय बिघडते? असा पालकांचा सवाल आहे.

‘त्या’ नंतरच निर्णय-

हवामान विभागाकडून रेड अलर्ट आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून जोपर्यंत शाळांच्या सुट्टीबाबत कळविण्यात येत नाही, तोपर्यंत सुटी जाहीर करणारे परिपत्रक काढले जात नाही. सुट्टीचा निर्णय झाल्यानंतरच परिपत्रक काढले जाते, असे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :मुंबईपाऊसशाळामहाविद्यालय