बेस्ट बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी हैराण, कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादाच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:14 AM2024-06-25T11:14:36+5:302024-06-25T11:20:11+5:30

लाखो मुंबईकरांसाठी लोकलनंतर लाइफलाइन असलेली बेस्ट उपक्रमाची सेवा तापदायक ठरत आहे.

in mumbai inadequate number of best buses incidents of employee and passenger disputes increased | बेस्ट बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी हैराण, कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादाच्या घटना

बेस्ट बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी हैराण, कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादाच्या घटना

मुंबई : लाखो मुंबईकरांसाठी लोकलनंतर लाइफलाइन असलेली बेस्ट उपक्रमाची सेवा तापदायक ठरत आहे. बसेसची अपुरी संख्या, ढिसाळ व्यवस्थापन दररोज नवनव्या वादाला निमंत्रण देणारे ठरू लागले आहे. बसच्या एका वाहकाला अलीकडेच वांद्रे येथे झालेली मारहाण या असंतोषाला तोंड फोडणारी ठरली असल्याचे म्हटले जात आहे.

बसेसची संख्या मर्यादित असल्याने बहुतेक बसेसना गर्दी असते. त्यातच बसथांब्यावर अनेक प्रवासी ताटकळलेले असतात. खेरवाडी, वांद्रे पूर्व येथे एका बसथांब्यावर बस न थांबल्याने संतप्त झालेल्या तिघांनी बसचा पाठलाग करून बसचालकाला मारहाण केली. गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी मूळ मुद्दा बसेसचा अपुरा ताफा, चालक, वाहकांचा बेदकारपणा, त्यांना न दिले गेलेले आवश्यक ते प्रशिक्षण, यामुळे असे प्रसंग निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसेस कमी आणि भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या जास्त आहे. अलीकडे इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बसेसना उत्तम प्रतिसाद आहे. 

किफायतशीर तिकीट दरामुळे अनेक मुंबईकर या बसेसची प्रतीक्षा करत असतात. पण या बसेस मध्येच बंद पडणे, वातानुकूलन यंत्रणा पुरेशा क्षमतेने न चालणे, काही वेळा वाहक, चालक यांना एसी नको असल्याने प्रवाशांची तगमग यामुळे खटके उडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. याबाबत तक्रारी करूनही काही होत नाही. कंत्राटी कर्मचारी प्रवाशांशी अत्यंत उद्धटपणे वागत असल्याने सुट्या पैशांसारख्या मुद्द्यावरून वादाचे प्रसंग होत असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जाते.

प्रवाशांवर राग-

कंत्राटी कामगारांना योग्य तो मोबदला मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे आर्थिक गणित बिघडते. ते चांगल्या मन:स्थितीत नसल्यामुळे कंत्राटी चालक आणि वाहकांकडून प्रवाशांसोबत वादावादीचे प्रसंग घडतात. बेस्ट बसेसच्या ताफ्यात वाढ झाल्यास अनेक प्रसंग टाळता येतील. बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बसेसवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी बेस्ट संघटना करत आहेत.

बसचालकाला झालेल्या मारहाणीचा निषेध आहे. मात्र, बऱ्याचदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमधून प्रवास करत असल्यामुळे गर्दीच्या बसथांब्यावर बरेचसे चालक बस थांबवणे टाळतात. बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यातील बसेसची रोजची घटती संख्या आणि कंत्राटी बसेसच्या नादुरुस्तीचे प्रमाण पाहता एका बसमध्ये दुपटीहून जास्त प्रवासी वाहून नेले जातात. यासाठी बेस्टने स्वमालकीच्या बसचा ताफा वाढवणे अपेक्षित आहे.- सिद्धेश म्हात्रे, आपली बेस्ट आपल्याचसाठी.

कोणत्याही शासकीय सेवेतील कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात जे नियम आणि कारवाई आहे, तीच वांद्रे प्रकरणातही होईल. दरम्यान, अशा घटना होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. - अनिल डिग्गीकर, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

Web Title: in mumbai inadequate number of best buses incidents of employee and passenger disputes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.