Join us  

...नंतरच 'भाभा' इमारतीचे उद्घाटन; मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:57 AM

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १५ जुलै रोजी उद्घाटन होणार आहे

मुंबई : वांद्र्यातील भाभा रुग्णालयात कंत्राटी व बहुद्देशीय कामगारांची भरती, वॉश बेसिन, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्याशिवाय रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार नाही, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १५ जुलै रोजी उद्घाटन होणार आहे. या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) पहिल्या मजल्यावर असणार आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. तसेच शौचालय, वॉश बेसिनचीही सुविधा नाही. याशिवाय रुग्णालयात कामगारांची १३५ पदे रिक्त आहेत. त्याशिवाय इतर विभागांतील कर्मचारी, तंत्रज्ञ व इतर संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.

असे असताना नवीन इमारतीचे उद्घाटन लवकर करण्यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरू झाली. या सर्वांकडे लक्ष वेधण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी सुधाकर शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी कामगार भरती, मूलभूत सुविधा पुरवल्याशिवाय नव्या इमारतीचे उद्घाटन करणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाहॉस्पिटल