मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:31 AM2024-07-16T10:31:11+5:302024-07-16T10:33:40+5:30
मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबईमेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेवर प्रवासी तिकीट विक्रीव्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची प्रक्रिया महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) सुरू केली आहे. या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवरील मोकळ्या जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत. त्यातून दरमहा १ कोटी १५ लाख रुपये भाडे मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा खाद्यपदार्थांचे स्टॉल, किरकोळ विक्री दालने आणि एटीएमसारख्या सुविंधासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा महामुंबई मेट्रोचा मानस आहे.
मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी झालेला मोठा खर्च केवळ तिकीट विक्रीतून उभारणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा भाड्याने देणे, स्थानकावर आणि परिसरात जाहिरातींचे हक्क देणे, मेट्रो स्थानकांच्या नावांचे ब्रॅण्डिंग करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार महामुंबई मेट्रोकडून खासगी कंत्राटदारांना अथवा दालनांसाठी मेट्रो मार्गिकेवरील जागा भाड्याने दिल्या जाणार आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील जवळपास ३० स्थानकांवरील या जागा आहेत.
महा मुंबई मेट्रोकडून तब्बल ७२ हजार चौरस फुटांच्या या भाड्याने देण्याचा प्रयत्न आहे. यातून दरवर्षाला कमीतकमी जवळपास १४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
कोणत्या स्थानकावर किती जागा-
१) डी. एन. नगर - १७०७९ चौ. फूट
२) लोअर ओशिवर - २७८३ चौ. फूट
३) वलनाई - २८५३ चौ. फूट
४) आनंदनगर - ३०५३ चौ फूट
यासाठी स्टॉल देणार भाड्याने-
१) खाद्यपदार्थांचे स्टॉल, किरकोळ विक्री दालने, एटीएम यासारख्या सुविंधाबरोबरच कार्यालये आणि सेवा दालनांसाठी जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत.
२) यामध्ये किऑस्कसाठी ५०० चौरस फुटांपर्यंत, तर अन्य दालनांसाठी ५०० फुटांपेक्षा अधिक मोठ्या जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान स्थानकावरील किऑस्कसाठी हे कंत्राट ५ वर्षांसाठी, तर अन्य सुविधांसाठी ८ वर्षांसाठी दिले जाणार आहे.
३) या जागा भाड्याने देण्यासाठी महा मुंबई मेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवर दरदिवशी २ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ मार्गिका सुरु झाल्यावर या प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.