पाऊस, गणेशोत्सवामुळे भाज्या कडाडल्या, मागणीतही वाढ : ग्राहकांच्या खिशाला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:18 AM2024-09-17T10:18:49+5:302024-09-17T10:20:19+5:30
ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेला पाऊस तसेच फळे आणि भाज्यांची मागणी वाढल्याने त्यांचे दर वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेला पाऊस तसेच फळे आणि भाज्यांची मागणी वाढल्याने त्यांचे दर वाढले आहेत. मात्र, अनंत चतुर्दशीनंतर भाज्यांचे व फळांचे दर कमी होतील, अशी शक्यता काही व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवात महाप्रसादासाठी कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, फरसबी, कोहळा, गाजर, भोपळा या भाज्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे या आठवड्यात फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. गणेश मंडळांकडून २०-२५ किलो फळभाज्यांची मागणी होती. त्यामुळे दुपारपर्यंत फळभाज्यांचा साठा संपत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
गौरीच्या नैवेद्यासाठी विविध पालेभाज्या करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या भाज्यांची मागणी वाढल्याने त्यांच्या दरांतही वाढ नोंदवली गेली. प्रसादासाठी फळांची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीही वाढल्याचे पाहायला मिळाले.
पाऊस आणि दुसरीकडे गणेशोत्सवातील वाढत्या मागणीमुळे फळांच्या किमतीत वाढ होते; परंतु यंदा दर आठवड्याला काही फळांच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ झाली. वाहतूक व अन्य बाबींमुळे फळांच्या किमतींत वाढ झाली; पण आता गणेशोत्सव संपून पितृपक्ष लागत असल्याने फळांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. - राम पवार, फळविक्रेते, दादर
फळे तिप्पट महाग-
नेहमी जी फळे ५००-६०० मध्ये मिळत होती, त्यासाठी १,५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत असल्याने आम्ही काही दिवस फळे खाणे थांबविली आहेत, असे दादर येथील माधवी सुतार यांनी सांगितले.