Join us

‘फ्लू’ने डोके धरले; मुंबईकर फणफणले! वेळीच उपचार घ्या : डॉक्टरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 10:05 IST

सध्या मुंबईकर सर्दी, डोकेदुखी आणि ताप यामुळे हैराण झाले आहेत. काही नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे.

मुंबई : सध्या मुंबईकर सर्दी, डोकेदुखी आणि ताप यामुळे हैराण झाले आहेत. काही नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे. फ्लू हा इन्फ्लुएंझा विषाणूंमुळे होणारा श्वसनाचा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार नाक, घसा आणि काही वेळा फुफ्फुसांना संक्रमित करतो.  यामुळे सौम्य ते गंभीर आजार होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

'फ्लू' हा आजार काही दिवसांसाठी होतो. मात्र, या दिवसांतही त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉक्टर सांगतात. फॅमिली डॉक्टरांकडे काही प्रमाणात या आजराचे रुग्ण येत आहेत. या आजारात बहुतांश लक्षणे चार ते सात दिवसांत निघून जातात. खोकला आणि थकवा काही आठवडे जाणवू शकतात. कधी कधी ताप परत येतो. काही लोकांना जेवणाची, काही खाण्याची इच्छा होत नाही. काही नागरिक साधारण ताप समजून स्वतःच उपचार घेतात. मात्र, काही वेळा असे उपचार घेणे धोकादायक ठरू शकते.

मुंबईत मागील काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने विविध प्रकारचे विषाणू सध्या वातावरणात आहेत. या विषाणूंचा संसर्ग होऊन नागरिकांना फ्लूसारखा आजार होत आहेत. त्यासोबत काही प्रमाणात का होईना स्वाइन फ्लूचेसुद्धा रुग्ण आढळत आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

फ्लूची लक्षणे काय?

१०२ अंशांपेक्षा जास्त ताप, श्वास घेण्यात अडचण, छाती किंवा पोटात तीव्र वेदना, चक्कर येणे, डोके जड होणे, अशी फ्लूसारखी लक्षणे असलेल्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

सध्या काही प्रमाणात स्वाइन फ्लू आणि साधारण इन्फ्लुएंझाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, काही दिवसांत उपचार घेतल्यानंतर ते बरे होत असल्याने नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, योग्य वेळी आजाराचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते, अन्यथा गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल मेडिसिन विभाग, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय.

सध्या फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. आम्ही त्यांची लक्षणे बघून त्यांच्यावर उपचार करत आहोत. काहींना नाक गळणे, थंडी वाजून ताप येणे आणि खोकला या सारखी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. अनिल पाचनेकर, फॅमिली फिजिशियन, धारावी 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग