मुंबई : मागील काही वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी दिल्ली ते गल्लीतील विषयही काही क्षणांतच सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर व्हायरल होत आहेत. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्यासपीठांवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) दररोज राजकीय हॅशटॅग ट्रेंडिग्समध्ये असल्याचे दिसून येते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांवर प्रभाव टाकण्यात आला. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपनंतर उद्धवसेना, अजित पवार गट, काँग्रेस, शरद पवार गट, शिंदेसेना, मनसे, आप, वंचित असे राजकीय पक्षही सोशल मीडियावर सक्रिय झाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वर दररोज राजकारण, पक्ष, नेते, उमेदवार, घटना, सत्ताधारी-विरोधक यांच्यातील वाद, राजकारणातील जुने-नवे संदर्भ अशा विविध मुद्द्यांवर हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असतात. मागील काही तासांमध्ये ‘एक्स’वर ट्रेंडमध्ये ‘महाराष्ट्र पाॅलिटिक्स’, ‘अरविंद केजरीवाल’, ‘टीएनविथमोदी’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ‘गोबॅकमोदी’, ‘मोदीडाउनडाउन’, ‘दिल्ली हायकोर्ट’ असे राजकीय हॅशटॅग्स ट्रेडिंगमध्ये होते.
अनेक नेते, उमेदवारांकडेही सोशल मीडियावर ॲक्टिव्हीटी सांभाळण्यासाठी स्वतंत्र चमू आहे. त्यामुळे या टीमद्वारे एकमेकांविरोधात टीका-टिप्पणी करणे, संदर्भ खोडून काढणे, सोशल मीडियावरील पोस्टमधून कुरघोडी करणे, मतदारांना भुरळ पाडण्यासाठी सोशल कॅम्पेन, स्पर्धा घेणे, अशा विविध पद्धती अवलंबिल्या जातात, अशी माहिती शिंदेसेनेची दक्षिण मुंबईतील सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सदस्याने दिली आहे.
व्हाॅट्सॲपवर शेअर-
१) हिंस्र किंवा अश्लील भाषेत राजकीय पोस्ट असल्यास त्यास सोशल मीडिया सेलद्वारे रिपोर्ट केल्या जातात किंवा डिलिट केल्या जातात. अशा पोस्टना अधिकृत पेजऐवजी अराजकीय भाषेत लिहायचे असल्यास अनेकदा अनऑफिशिअल पेजवरून उत्तर दिले जाते.
२) समूहाची ताकद दाखविण्यासाठी ठराविक पोस्ट व्हाॅट्सॲपवर शेअर करून त्याला उत्तर देण्याचे आदेश दिले जातात. एकाच वेळी सर्व नेटिझन्सकडून त्या विषयाची दखल घेत पोस्ट केले जाते.
ऑफिशिअल- अनऑफिशिअल माध्यमातून होते पोस्ट-
१) अनेकदा पक्षांचे ऑफिशिअल- अनऑफिशिअल असे दोन स्वरूपाचे पेज असतात. यात विकासकामे, आश्वासने, उमेदवार-नेत्यासंदर्भात दैनंदिन माहिती-उपक्रमाची माहिती ऑफिशिअल पेजेसद्वारे दिली जाते. याउलट, अनऑफिशिअल पेजद्वारे विरोधकांना प्रत्युत्तर, ट्रोल्स करणे, विरोधकांविरोधात पोस्ट, काॅमेंट करणे अशा ॲक्टिव्हीटी केल्या जातात. २) एखादी पोस्ट वा संदेश, नेता, उमेदवार सातत्याने विरोधात किंवा नकारात्मक पोस्ट करत असेल तर ते पेज एकत्रितरीत्या ठरवून सातत्याने रिपोर्ट केले जातात. त्यानंतर वारंवार रिपोर्ट केल्यामुळे हे पेज सस्पेंड केले जाते. अशी कामे करण्यासाठी सोशल मीडियाच्या चमूमध्ये २५-५० जण असतात. त्यांच्याकडे ग्राफिक, कंटेट, व्हिडीओ, शूट, रिसर्च, शेअरिंग वाढविणे, ट्रेंडिंगमध्ये आणणे अशी कामे दिली जातात, अशी माहिती भाजपच्या सोशल मीडियातील सदस्याने दिली.