मुंबई :धारावी येथे पात्र-अपात्रतेच्या सर्वेक्षणावरून गोंधळ सुरू असतानाच धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन भाडेतत्वावरील घरांत धारावीबाहेर करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडून मुलुंड येथील रहिवासी ॲड. सागर देवरे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या तपशिलानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन धारावीमध्येच करण्याचे प्रस्तावित आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन भाडेतत्त्वावरील घरांमध्ये धारावी वसाहतीच्या बाहेर करण्याचे प्रस्तावित आहे. भाडेतत्वावरील घरे बांधण्यासाठी रिक्त असलेल्या शासकीय जमिनीची मागणी केलेली आहे. त्या उपलब्ध झाल्यावर त्या जमिनीवर अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन भाडेतत्वावर करण्यात येणार आहे.
दरम्यान, धारावीत अपात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड जकात नाका, डम्पिंग ग्राउंड, मुलुंड-भांडुप-विक्रोळीमधील मीठागरांच्या जमिनीवर जोर दिला जात आहे. मात्र आमचे पुनर्वसन येथेच झाले पाहिजे, या मागणीवर धारावीतील रहिवासी ठाम आहेत.