भाजीपाल्याने खाल्ला भाव, गृहिणींचे बजेट कोलमडले; खर्चाचा ताळमेळ बसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:53 AM2024-05-27T09:53:16+5:302024-05-27T09:56:04+5:30
भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने मुंबईतील बाजारांत आवक कमी झाली आहे.
मुंबई : यंदा उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच राज्याच्या विविध भागांत पाणीटंचाई जाणवू लागली असून, त्याचा परिणाम भाजीपाल्याचा उत्पादनावर झाला आहे. भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने मुंबईतीलबाजारांत आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर वाढले असून, गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे.
एकीकडे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे, तर दुसरीकडे उन्हामुळे भाज्या लवकर खराब होत आहेत. भाजीपाला सुकल्याने तो फेकून द्यावा लागत आहे. त्यातून खराब मालाचे प्रमाण वाढल्याने विक्रेत्यांना दर वाढवावे लागत आहेत. भाज्यांबरोबर फोडणीही महाग झाली आहे. लसणाचे दर किलोमागे २४० ते ३२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे खरेदी करताना गृहिणी हात आखडता घेत आहेत.
यंदा सर्वत्र कडक उन्हाळा पडला आहे. बहुतांश भागात पाण्याचा अभाव आहे. त्यातून उत्पादन घटल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. - शंकर चोरगे, भाजीविक्रेते, स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मार्केट, दादर
सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाजी खरेदीसाठी जावे की नाही हा प्रश्न पडू लागला आहे. एवढ्या महागड्या भाज्या खरेदी करून घरखर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. आधी दर महिन्याला काही रक्कम जपून ठेवत होतो. आता ही बचत करणेही अवघड होऊन बसले आहे. - शांताबाई निकम, गृहिणी