डेकोरेशन साहित्याची माहिती ‘इको बाप्पा’वर ॲपवर ; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:51 AM2024-08-30T10:51:59+5:302024-08-30T10:53:03+5:30
दहीहंडीनंतर आता मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, मुंबईतल्या कानाकोपऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासह सजावटीची तयारी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहीहंडीनंतर आता मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, मुंबईतल्या कानाकोपऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासह सजावटीची तयारी सुरू केली आहे. घरगुती गणेशोत्सवाची लगबगही वाढू लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला पर्यावरणाची किनार लाभावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘इको बाप्पा’ हे ॲप गणेशभक्तांच्या सेवेत दाखल झाले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘इको बाप्पा’ हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे.
ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणारे कारखानदार यांची ठिकाणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना घेता येणार आहेत. इको बाप्पा हे ॲप मोबाइल प्ले स्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येणार असून, यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी, आभूषणे, सजावटीचे साहित्य व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध आहे.
शहाणपण देगा देवा-
पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी मंडळाने शहाणपण देगा देवा या संकल्पनेतून रेडिओ जिंगल्स्, व्हिडीओज् तयार केले आहेत. एक लहान बालक पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा अभिनव संदेश यात देत आहे.
घरगुती गणेशमूर्तींवर शेवटचा हात-
मुंबईतल्या बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल झाल्या आहेत. उर्वरित गणेशमूर्तीही मार्गस्थ होत आहेत. येत्या रविवारी अर्ध्याधिक गणेशमूर्ती मंडपाकडे रवाना होणार असून, नंतरच्या आठवड्यात गणेश मूर्तिकारांकडून छोट्या म्हणजे घरगुती गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. तत्पूर्वी, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळही कामाला लागले आहे.