Join us  

रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 9:55 AM

मुंबईतील रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे व्यवस्थित होत आहेत की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने काही संस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सर्व संस्थांना मिळून सव्वाशे कोटी रुपयांची बिदागी दिली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या खर्चात आणखी भर पडली आहे.

रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक परिमंडळात दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक संस्थेला ११ ते १८ कोटी  दिले जाणार आहेत. मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. 

पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची कामे ३० टक्के पूर्ण झाली आहेत. उपनगरातील रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होतील. सर्व रस्त्यांसाठी ६,०७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही कामे करण्यासाठी पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. ही कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. फेब्रुवारी २०२४ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमीच्या रस्त्यांच्या कामासाठी सहा  हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. दोन वर्षांत सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

 शहर भागातील कामे रखडली-

१) शहर भागातील रस्त्यांची कामे वादात सापडली होती. २०२२ साली या कामांसाठी निविदा काढून कंत्राटही दिले होते. मात्र, वर्ष झाले, तरी कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

२) विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि पालिकेवर आरोप केले होते. त्यामुळे अखेर या कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यात आले. त्याला दंडही ठोठावला. त्याविरोधात कंत्राटदार न्यायालयातही गेला होता. 

३) वाद मिटल्यानंतर पुन्हा निविदा काढली. ही निविदा पूर्वीच्या दरापेक्षा चढ्या दराची असल्याने पुन्हा वाद झाला होता. त्यात शहरातील कामे रखडली होती.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकारस्ते वाहतूकरस्ते सुरक्षा