लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या नाहूर येथील प्रस्तावित पक्षी घरासाठी आरक्षित असलेली जागा अपुरी आहे. त्याचबरोबर तेथे भराव टाकण्यात येणार असल्याने आसपासच्या परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. पक्षी घर पाहण्यासाठी येणाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा आहे का, अशी विचारणा जाणकारांनी पालिकेकडे केली आहे. तर, काही पक्षी अभ्यासकांनी या प्रकल्पामुळे पर्यावरण, निसर्ग आणि पक्षी यांच्याविषयी लोकांमध्ये अधिक जागृती होईल, पर्यायाने निसर्ग संवर्धन करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नाहूर येथील पक्षी घर उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी संबंधित भूखंडाचे आरक्षण बदलण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पालिकेने नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यावर पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनी आपली मते पालिकेला कळवली आहेत. पक्षी घराची अपुरी जागा, प्रकल्पासाठी टाकण्यात येणारा भराव व त्यामुळे पाणी साचण्याची भीती, याकडे वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेने पालिकेचे लक्ष वेधले आहे.
वाहनांच्या पार्किंगचे काय?
पक्षी घर पाहण्यासाठी पक्षीप्रेमी, अभ्यासक तसेच शाळांच्या सहली येतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने येतील. ही वाहने उभी करण्यासाठी परिसरात जागा आहे का? जगातील अनेक देशांत पक्षी घरे आहेत. काही ठिकाणी खासगी पक्षी घरेही आहेत. मात्र, तेथे ५०० ते १००० वाहने उभी होतील, अशी व्यवस्था आहे. त्या धर्तीवर नाहूर येथे व्यवस्था असणार का, अशीही विचारणा ‘वॉचडॉग’ने केली आहे.
‘नागरिक होतील सजग’-
पर्यावरण अभ्यासक आयझॅक किहीमकर यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. पक्षी घरात परदेशी पक्षी असतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अभ्यासक येथे येतील. त्यांना पक्ष्यांच्या नव्या प्रजातींचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. शाळकरी मुलांनाही पक्षी घर पाहण्याची संधी मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तसेच पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.