मुंबई : शहरात पुरवठा होणाऱ्या दुधातील भेसळ ओळखणे कठीण बनले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून दुधाचे नुमने घेतले जातात. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने ‘दूध का दूध पानी का पानी’ करण्यासाठी नमुने कोण तपासणार, हा मोठा प्रश्न प्रलंबित आहे.
...तर कारवाई करणे सोपे
१) दुधाची भेसळ रोखण्यासाठी अचानक भेटी घेऊन दुधाची तपासणी केली जाते. खुल्या दुधाची विक्री करणाऱ्या केंद्रावर दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.
२) ते पुढे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. त्याचा अहवालात काही दोष आढळल्यास कारवाई करणे अधिक सोपे होते, असे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे म्हणणे आहे.
मुंबई शहरात रोज एक कोटी लिटर दूध-
मुंबईला रोज साधारण एक कोटी लिटर दूध लागते. त्यापैकी ९० लाख लिटर दूध, तर १० लाख लिटरच्या दुग्धजन्य पदार्थांची गरज असते. चांगल्या पदार्थांची ग्राहकांची अपेक्षा असते.
पाच महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले-
१) गेल्या पाच महिन्यात एकूण ३२० ठिकाणी अचानक भेटी घेऊन दुधाची तपासणी करण्यात आली आहे. खुल्या दुधाची विक्री करणाऱ्या केंद्रावरील दुधाची तपासणी केली जात असून आतापर्यंत १८० नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
२) एवढ्या मोठ्या मुंबईत दुधाचे नमुने घेण्यासाठी अन्न प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे कारवाईसाठी दुधाचे सॅम्पल घेण्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय प्रयोगशाळेत अहवाल लवकर मिळण्याची हमी नसते.
३) शासनाकडून पॅकबंद दूध विक्रीचे बंधन असते. मात्र, अनेक ठिकाणी भेसळखोर खुले दूध विकताना दिसतात. त्यामुळे दूध भेसळीमुळे होणारे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात.