जे. जे. उड्डाणपुलाची लवकरच डागडुजी; ८ जॉइंट प्लेट्स बदलण्यासाठी 'MSRDC' नेमणार कंत्राटदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:02 PM2024-07-22T12:02:50+5:302024-07-22T12:06:20+5:30
दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जे. जे. उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतले जाणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जे. जे. उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतले जाणार आहे. या उड्डाणपुलाच्या जीर्ण झालेल्या जॉइंट प्लेट्स बदलल्या जाणार आहेत. एमएसआरडीसीकडून लवकरच या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे.
एमएसआरडीसीच्या अखत्यारित मुंबई शहर, उपनगरांत मिळून ३२ उड्डाणपूल आहेत. यातील यातील २७ उड्डाणपूल हे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहेत. हे बहुतांश उड्डाणपूल २००० च्या आसपास उभारण्यात आले आहेत.
पूल झाला जुना-
१) या पुलांची देखभाल आणि दुरुस्ती कामे एमएसआरडीसीकडून केली जाते; मात्र आता हे उड्डाणपूल जुने झाले असल्याने त्यांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्तीची कामे एमएसआरडीसी केली जात आहे.
२) यातील बहुतांश पुलांची ‘आयआयटी’ अथवा ‘व्हीजेटीआय’ या संस्थांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानुसार दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत.
१) बदलण्यात येणारे ८ जॉइंट प्लेट्स
२) कामासाठी अपेक्षित खर्च - ४४ लाख रुपये
३) कामाचा कालावधी - ३ महिने
कामे कधी होणार ?
एमएसआरडीसीकडून या कामांसाठी लवकरच कंत्राटदार नेमला जाणार आहे. कंत्राटदाराला वाहतुकीला अडथळा आणू न देता कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत दुरुस्ती करावी लागणार आहे.
प्लेट्स झाल्या जीर्ण -
१) भेंडी बाजार परिसरातून जाणाऱ्या जे. जे. उड्डाणपुलाच्या जॉइंट प्लेट्स आता जीर्ण होऊ लागल्या आहेत.
२) त्यामुळे त्या बदलून त्याजागी नव्या जॉइंट प्लेट्स बसविण्यात येणार आहेत. एकूण आठ जॉइंट प्लेट्स बदलल्या जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
३) या कामासाठी ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया एमएसआरडीसीने सुरू केली आहे.