मुंबई : मलेरिया आणि डेंग्यू आजार प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका जपानमधून खास रसायन आयात करणार आहे. अवघ्या १५ मिनिटांत डास मृत झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे. २०१७ पूर्वी पालिकेकडून या रसायनाचा वापर होत होता.
मात्र, जपानी कंपनीच्या आयाती संदर्भातील धोरणानंतर याचा वापर बंद झाला होता. मात्र, आता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या प्रयत्नानंतर याचा वापर पुन्हा होणार आहे. पावसाळा सुरू झाला की, मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागतो. गेल्या वर्षी मुंबईत मलेरियाचे सात हजार, तर डेंग्यूचे साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. यंदा अवघ्या सहा महिन्यांत मलेरियाचे दोन हजार ४००, तर डेंग्यूचे ३८१ रुग्ण आढळले आहेत.
मलेरिया आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने या आजारांचे वाहक असलेल्या डासांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सायफेनोथ्रिन नावाचे रसायन महापालिकेने जपानच्या सुमितोमो केमिकल कंपनीकडून आयात केले आहे.
मान्यताप्राप्त रसायन-
१) या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटना आणि एनवीबीडीसीपीची टीम मुंबईत होती.
२) राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (एनवीबीडीसीपी) ने देखील 'सायफेनोथ्रिन'ला मान्यता दिली आहे.
३) मलेरिया व डेंग्यूचे सातत्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आराखड्याला बळकटी देण्याचे काम सुरू आहे.
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीचा अवलंब केला जाईल, ज्यामध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या विशिष्ट वॉर्डाना लक्ष्य केले जाईल.डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आचारसंहितेनंतर निविदा निघणार-
एखाद्या व्यक्तीचे रक्त शोषल्यानंतर डास एकाच खोलीत एकाच ठिकाणी थांबतात, कारण रक्त शोषल्याने डासांचे शरीर जड होते. अशा परिस्थितीत हे डास बंद खोलीत धुक्यामुळे मरतात, अशी माहिती कीटकनाशक विभागाचे प्रमुख चेतन चौबळ यांनी दिली.
सध्या संबंधित जपानी कंपनीने सुमारे चार हजार लिटर रसायन पालिकेला सीएसआर निधीतून दिले आहे. या रसायनाची चाचणी गेल्या आठवड्यात झाली, जी डासांना मारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरली. आचारसंहितेनंतर आणखी रसायनाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.