जुलैमध्ये नोकऱ्यांच्या मागणीत १२ टक्के वाढ; रिअल इस्टेट, औषध निर्मिती,'FMCG' क्षेत्रात संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 11:43 AM2024-08-09T11:43:49+5:302024-08-09T11:47:51+5:30
नुकत्याच सरलेल्या जुलै महिन्यात मागील वर्षीच्या जुलैच्या तुलनेत रोजगाराच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
मुंबई : अर्थव्यवस्थेत घडत असलेल्या सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संख्येत वाढ नोंदली जात असल्याचा निष्कर्ष रोजगार क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या जॉबस्पीक इंडेक्स या संस्थेने काढला आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, नुकत्याच सरलेल्या जुलै महिन्यात मागील वर्षीच्या जुलैच्या तुलनेत रोजगाराच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. या सर्वेक्षणानुसार जून २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेतही ११ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
औषध निर्मिती, एफएमसीजी क्षेत्रात प्रत्येकी २६ टक्के वाढ-
१) औषधनिर्मिती क्षेत्रात २६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली असून, या क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार गुजरातमधील बडोदा व हैदराबाद येथे निर्माण झाला आहे.
२) एफएमसीजी अर्थात दैनंदिन वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमधील रोजगारात २६ टक्के वाढ झाली असून, यामध्ये बंगळुरू आणि कोलकाता शहरात सर्वाधिक रोजगार निर्माण झाले आहेत.
३) देशात गेल्या दीड वर्षापासून बांधकाम क्षेत्रात मोठी तेजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील रोजगारातही २३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
४) दिल्ली-एनसीआर आणि हैदराबाद या शहरांमधील बांधकाम उद्योगात सर्वाधिक रोजगार प्राप्त झाले आहेत.
गुजरातमधील रोजगार वाढल्याचे दिसते. हैदराबादमध्ये सेवा उद्योग, विमान उद्योग, बीपीओ आणि तेल व गॅस क्षेत्रात प्रामुख्याने रोजगार वाढला आहे, तर विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे देखील उत्तम रोजगार वाढल्याचे या सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे.
... या शहरांत वाढला रोजगार
१) राजकोट ३९%
२) जामनगर ३८%
३) बडोदा २५%
‘एआय’चा फायदा माहिती तंत्रज्ञान उद्योगाला-
१) गेल्या काही वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे.
२) याचा थेट फायदा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला झाला असून, जुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये या क्षेत्रामध्ये १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
३) मशीन लर्निंग, डेटा संशोधक, बीआय मॅनेजर्स आणि प्रॉडक्ट मॅनेजर्स या पदांमध्ये सर्वाधिक भरती झाली आहे.