Join us

हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:56 AM

जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर वाहतूक व्यवस्थापनासंबंधी कामे व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त  आयुक्त अभिजीत बांगर यांनी  भेट देत पाहणी केली. सध्या या पुलावरून हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. 

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सर्व कामे पूर्ण केली आहेत. या अंतर्गत बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलिमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटरवर उचलण्यात आला. या जोडणीसाठी दोन महिन्यांपासून काम सुरू होते. 

‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’चे मार्गदर्शन -

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाजी (आयआयटी), वीरमाता जिजाबाई टेक्नाॅलाॅजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या संस्थांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. गुरुवारपासून या पुलावर जुहूकडून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्ट्रक्चरली सेफ) असल्याचे ‘व्हीजेटीआय’कडून सांगण्यात आले.

... तरच अवजड वाहनांना प्रवेश

गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू असल्याने गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा दिली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाइट बॅरिअर) बसविले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करताना बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरीआयआयटी मुंबई