कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:43 AM2024-07-19T11:43:50+5:302024-07-19T11:47:53+5:30
कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे.
मुंबई : कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये लहान वाहनांची चाके अडकत असून, ती उलटण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत घडले आहेत.
त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आर दक्षिण विभागाचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबईत सध्या अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कांदिवलीतील लिंक रोड परिसरातील लालजी पाडा पोलिस चौकी जवळून ईरानीवाडी, अतुल टॉवरजवळून कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्याची सध्या वाताहत झाली आहे. पावसामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने त्यात आदळत आहेत. मोटार, रिक्षा, तीन चाकी टेम्पो अशा लहान वाहनांची चाके खड्ड्यांत रुतत आहेत. गेल्या काही दिवसांत टेम्पो उलटल्याचीही घटना घडली होती. पालिकेकडून खड्डा बुजविण्यात विलंब होत असल्याने प्रशासन मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का? असा संतप्त सवालही स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
खड्डे बुजविण्यासाठी बजेट नाही का?
कांदिवलीच्या शिवशंकर नगर २ परिसरात चिखलाचे साम्राज्य आहे. दर अर्ध्या तासाने सुरक्षारक्षक साफसफाईचे काम करतात. खड्ड्यांतील पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. पालिकेने इमारतीत साथीच्या आजारांपासून सुरक्षित राहण्याबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावले आहेत. मात्र, खड्डे न बुजवता केवळ पोस्टरबाजी सुरू आहे. याबाबत मी पालिकेला ट्विट करत खड्डे बुजविण्यासाठी बजेट नाही का, अशी विचारणा केली आहे, असे स्थानिक रहिवासी ॲड. तोसिफ खान यांनी सांगितले.
आमची मुलं पडतात, शाळा चुकते !
१) लालजीपाडा परिसरात दीड महिन्यापूर्वी बिल्डरने काँक्रीटचा रस्ता बनविला होता. त्यावर फक्त डांबर टाकले असते, तर निदान पावसाळा सहज निघाला असता. मात्र पालिकेने तो पूर्ण खोदून त्यावर दगड टाकून सिमेंट पसरवले. आता पावसात ते सिमेंट निघाले असून, सर्वत्र चिखल होत आहे.
२) चिखलातूनच वाट काढत शालेय विद्यार्थी ये-जा करतात. घसरून पडल्याने गणवेश खराब झाल्याने शाळाही बुडाली आहे. विद्यार्थ्यांना दुखापतही झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. रिक्षाचालकही या परिसरात भाडे घेण्यास नकार देतात, असे स्थानिकांनी सांगितले.