Join us  

खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:27 AM

कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे.

मुंबई : कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता अद्याप झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला नाही; तसेच याबाबत सतत पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या प्रकरणी आम्ही बिल्डरला नोटीस बजावल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले. 

‘लोकमत’ने ‘कांदिवलीची झाली खड्डेवली’ या मथळ्याखाली शुक्रवारी लालजीपाडा येथील रस्त्याची दुरवस्था छायाचित्रांसह मांडली होती. या संदर्भात पालिकेच्या कांदिवलीतील आर / दक्षिण विभागाचे सहायक अभियंते (मेंटेनन्स) समीर सानप यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘शिवशंकर एसआरए १ आणि २ या इमारतींसमोरील सीटीएस क्रमांक ८१९ हा रस्ता खासगी आहे. तो मंगुभाई दत्तानी पुलाचा विस्तारित असून, तो पुढे एस. व्ही. रोडला जोडला जातो. तेथे ‘एसआरए’ ब्रिझेयल डेव्हलपर्स ॲण्ड रिॲल्टर्स एलएलपीच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. आम्ही ‘एसआरए’कडे पाठपुरावा करूनही तो रस्ता अद्याप आमच्याकडे हस्तांतरित झालेला नाही. या प्रकरणी बिल्डरलाही नोटीस बजावली आहे.’ 

पालिका-‘एसआरए’च्याअधिकाऱ्यांत ‘तू-तू-मैं-मैं’-

१) पालिका आणि ‘एसआरए’मधील ‘तू-तू-मैं-मैं’मुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. 

२) खड्ड्यांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

बिल्डरला केली सूचना -

लालजीपाडा येथील रस्ता महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना आम्ही बिल्डरला केल्या आहेत. त्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाईल, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पवार यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकांदिवली पूर्वखड्डे