कांजूर डम्पिंग ग्राउंड प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार; न्यायालयीन सुनावणी याच आठवड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:04 AM2024-07-18T11:04:36+5:302024-07-18T11:07:15+5:30
आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर होत असलेल्या या सुनावणीकडे कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडुपमधील सर्व रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड प्रकरणी या आठवड्यात उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर होत असलेल्या या सुनावणीकडे कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडुपमधील सर्व रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती असणाऱ्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड उभारल्यामुळे कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडुप या तिन्ही विभागांत गेली अनेक वर्षे नाराजी आहे. येथील नागरिकांकडून डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हा जनक्षोभ लक्षात घेऊन सुरुवातीला काही राजकीय पक्षांनी डम्पिंग ग्राउंड हटाव म्हणून आंदोलनेही केली. मात्र, कालांतराने त्यांच्या आंदोलनात फारसा जोर राहिला नाही.
भूमिका निवळली-
१) यथावकाश सर्वच पक्षांची डम्पिंग ग्राउंडबाबतची आक्रमक भूमिका निवळली. त्यामुळे अखेर काही स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेऊन याप्रकरणी न्यायालयीन लढा सुरू केला.
२) येथील नागरिक आता पदरमोड करून न्यायालयात खटला चालवण्यासाठीचा खर्च करत आहेत. गेली आठ वर्षे हा लढा सुरू असून आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्याचा प्रश्न-
डम्पिंग ग्राउंडमुळे गेल्या काही वर्षांत या परिसरात आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असून दुर्गंधीमुळेही लोक त्रस्त आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनला होता. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांनी निवडून आल्यास डम्पिंग ग्राउंडला मुदतवाढ मिळू देणार नाही, असे आश्वासन दिले होते.