‘केईएम’च्या शववाहिन्या चालकांअभावी गॅरेजमध्ये; दीड महिन्यापासून सेवा बंद असल्याने परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:06 AM2024-06-28T10:06:41+5:302024-06-28T10:18:20+5:30
केईएम रुग्णालयातील दोन शववाहिन्या चालकांअभावी दीड महिन्यापासून गॅरेजमध्ये उभ्या आहेत.
मुंबई : केईएम रुग्णालयातील दोन शववाहिन्या चालकांअभावी दीड महिन्यापासून गॅरेजमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे मृतदेह नेण्यासाठी मृताच्या नातेवाइकांना खासगी शववाहिनीवर अवलंबून राहावे लागत असून, त्याचे दुप्पट भाडे मोजावे लागत आहे. परिणामी, त्यांची मोठी परवड होत आहे.
पालिकेच्या चार मुख्य आणि १५ उपनगरी रुग्णालयांत दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचार घेतात. यात प्रामुख्याने गरीब वर्गातील रुग्णांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांत शववाहिन्या असून, त्याची मोफत सेवा दिली जाते. मात्र, केईएम रुग्णालयातील दोन शववाहिन्या चालक नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. त्याचा गैरफायदा घेत ‘केईएम’ परिसरातील खासगी शववाहिन्या मालकांनी नेहमीच्या दरापेक्षा जास्त दर आकारणी सुरू केली आहे.
परिणामी, मृताच्या नातेवाइकांना नाईलाजाने जादा भाडे मोजून खासगी शववाहिन्यांची सेवा घ्यावी लागत आहे, याकडे शिवडी विभागातील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सचिन पडवळ यांनी लक्ष वेधले
‘मग चालक का उपलब्ध नाहीत?’
१) शववाहिन्या बंद असल्याबाबत पालिकेच्या वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता, वाहनचालक उपलब्ध नाही, असे उत्तर देण्यात आल्याचे पडवळ यांनी सांगितले.
२) पालिकेत कंत्राटी पद्धतीने वाहनचालकांची नियुक्ती केली जाते. मग, वाहनचालक कसे काय उपलब्ध नाहीत? ‘केईएम’सारख्या प्रचंड गर्दीच्या रुग्णालयात शववाहिन्यांची सेवा दीड महिने बंद असेल तर काय करावे, असा सवाल त्यांनी केला.
३) शववाहिन्यांची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पडवळ यांनी वरळी येथील पालिकेच्या परिवहन विभागाच्या अभियंत्यांना पत्र दिले आहे. काही दिवस वाट बघू, अन्यथा जाब विचारू, असा इशारा पडवळ यांनी दिला आहे.