मुंबई : गुजरातमध्ये सध्या चांदीपुरा आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. माशांमुळे होणाऱ्या या आजारामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अलर्ट मोडवर आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून डास आणि माशांचा उपद्रव होऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागते.
काय आहे हा आजार?
मातीतल्या माशांमुळे (सॅन्डफ्लाय) हा आजार पसरतो. या माशा गळक्या घरांमध्ये किंवा मातीच्या घरांच्या भेगांमध्ये आढळतात. हा साथीचा आजार नाही. मात्र एखाद्या संक्रमित मुलाला चावलेली माशी दुसऱ्या सुदृढ मुलाला चावली, तर त्या निरोगी बालकालाही संसर्ग होऊ शकतो. सध्या गुजरातच्या विशिष्ट भागात हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे.
चांदीपुरा आजाराविषयी नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रात जागृती होणे गरजेचे आहे. अजूनही अनेकांना या आजाराविषयी फारशी माहिती नाही. लहान मुलांना या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो. गुजरातच्या काही भागांत या आजाराने डोके वर काढले असून महाराष्ट्राने अलर्ट राहणे आवश्यक आहे. डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन
काय खबरदारी घ्यावी?
घर व परिसर स्वच्छ ठेवावा. उकिरडा गावापासून दूर ठेवावा, मच्छरदाणीत झोपावे, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, डास आणि माशांचा उपद्रव होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी. घरातील भिंतीच्या भेगा बुजवाव्यात. पाळीव प्राण्यांचा गोठा आणि कोंबड्यांची खुराडी घरापासून दूर ठेवावीत. शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावेत.
आजाराची लक्षणे-
उच्च दर्जाचा ताप, अतिसार, उलट्या होणे, स्ट्रेचिंग, निद्रानाश, अर्ध-चेतन अवस्था, काही तासात कोमात, त्वचेवर खुणा वाढतात.
सध्या शहरी भागातील झोपडपट्टीतही रुग्ण-
१) महाराष्ट्रात १९६५ साली नागपूरमधील चांदीपुरा भागात रुग्णांच्या नमुन्यात हा आजार आढळून आला. त्यामुळे त्याचे नाव चांदीपुरा असे ठेवण्यात आले. या आजाराच्या विषाणूचा प्रसार सॅन्डफ्लाय माशी चावल्यामुळे होतो. ही माशी डासापेक्षा लहान असते, तिचा रंग वाळूसारखा धुरकट असतो.
२) माशीचे पंख केसाळ असतात. भारतात या माशीच्या ३० प्रजाती आढळतात. या माशा रात्रीच्या वेळी क्रियाशील असतात. मादी माशीला दर तीन किंवा चार दिवसांनी अंडी घालण्याकरिता रक्ताची आवश्यकता असते. हा आजार प्रमुख्याने ग्रामीण भागात आढळतो. सध्या शहरी भागातील झोपडपट्टीतही या रुग्णांचे प्रमाण आढळून येत आहे.