चला, भारतातील सिनेमा कसा घडत गेला ते पाहू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 09:19 AM2023-10-23T09:19:11+5:302023-10-23T09:19:33+5:30
मुंबईत आपलं स्वप्न पूर्ण होतं, असं मानलं जातं.
योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक
मुंबईत आपलं स्वप्न पूर्ण होतं, असं मानलं जातं. आशिया खंडातील सिनेमा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून मुंबई ओळखली जाते. मुंबईतील बॉलिवूडचे आकर्षण कोणाला नाही. अनेक जण येथे नशीब आजमावयाला येतात. कोणाला सिनेमात हीरो व्हायचे असते तर कोणाला हिरोईन. बॉलिवूडप्रमाणे देशभरातील विविध भारतीय भाषांमध्येही सिनेमे तयार होतात. जगात सर्वाधिक सिनेमे भारतात तयार होतात. भारतीय सिनेमा वेडे आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, मधुबाला, अमिताभ बच्चन, रेखा यांच्यापासून ते शाहरूख खान, माधुरी दीक्षित ते रणबीर कपूर, अलिया भट यांच्यापर्यंत अनेकांचे चाहते घराघरात आहेत.
पेडर रोडवर फिल्म प्रभाग परिसरात गुलशन महल आणि शेजारच्या इमारतीत भारतीय सिनेमाचा १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास जतन केला आहे. भारतीय सिनेमाचे हे राष्ट्रीय संग्रहालय पाहिल्यानंतर रसिकांचे डोळे दिपून गेल्याशिवाय राहणार नाहीत. फ्रान्सच्या लुमिएर बंधूंनी १८९६ साली मुंबईत चलचित्राचा आविष्कार दाखविल्यानंतर भारतात १९१३ मध्ये निर्माण झालेला पहिला सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र ते २१व्या शतकातील सिनेमाची सफर आपल्याला या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात घडते.
संग्रहालयात अनेक कलाकृती आहेत. १०० वर्षांतील हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती आदी भाषांतील सिनेमाची पोस्टर्स आपले लक्ष वेधून घेतात. नव्या इमारतीत चार प्रदर्शन हॉल आहेत. येथेही विविध दालन आहेत. सिनेमा ही गोष्ट सांगण्याची कला आहे. मात्र, ते विज्ञानाचे अपत्य असल्याने लाईट, कॅमेऱ्यापासून विविध तांत्रिक साहित्यही आपल्याला येथे पाहता येते. नायक आणि नायिकांची पंरपरा दाखविणारी पोस्टर्स जुन्या काळात घेऊन जातात. सिनेमाचा डिजिटल प्रवास येथे अनुभवता येतो. सिनेमा दिग्दर्शकाची कलाकृती मानली जाते. शो-मॅन राज कपूर ते देशभरातील आताच्या अनेक दिग्दर्शकांचे सिनेमे आपल्याला हे समजून घेता येतील. काही ठिकाणी स्क्रीन ठेवले आहेत. तेथे विविध सिनेमातील गाजलेली दृश्ये आपल्याला पाहता येतील.
सिनेमाची ९ विभागांत मांडणी
सिनेमाची सुरुवात, भारतात आगमन, मूकपट, बोलपटाची सुरुवात, स्टुडिओचे युग, दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव, कल्पकतेचा वापर, न्यू वेव सिनेमा, प्रादेशिक सिनेमा.
बाल फिल्म स्टुडिओ
बच्चे कंपनीसाठी छोटा चेतनपासून अनेक सिनेमांची सफर घडते. क्रोमा- मल्टिस्क्रीन स्टुडिओ, ॲनिमेशन, साऊंड इफेक्ट-मिक्सिंग, फोटो शूट स्टुडिओ पाहायला मिळतात.
मराठीचे खास दालन
मराठी सिनेमाचे स्वतंत्र दालन आहे. राजा हरिश्चंद्रपासून ते हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमांची पोस्टर्स, गाणी आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ जणू येथे आपल्या भेटीला आले आहेत.
कधी पाहता येईल?
मंगळवार ते रविवार : सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:००
(सोमवार आणि सार्वजनिक सुटीला संग्रहालय बंद असते)