मुंबई :मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहजपणे पोहोचविणारी लोकल आजघडीला जीवघेणी ठरत आहे. घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना तर लोकलने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
दररोज पहाटे उठून स्वयंपाक करून, पती तसेच कुटुंबातील लहान, ज्येष्ठ सदस्यांना काय हवे-नको ते सर्व बघून घाईघाईत ऑफिस गाठणाऱ्या महिलांनीही रेल्वेच्या नावाने बोटे मोडली आहेत.
लोकलची वाढती गर्दी आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे दररोज ऑफिसमध्ये लेटमार्क लागत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे लोकल वेळेवर धावणार कधी? आणि एवढ्या गर्दीत लोकल पकडायची तरी कशी? असा संतप्त सवाल महिला प्रवाशांनी केला आहे.
सुविधा नाही-
उपनगरी लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे; पण पाहिजे तशा सुविधा रेल्वेने प्रवाशांना दिलेल्या नाहीत. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या खूपच कमी आहे. काही ठिकाणी सिग्नलची समस्या असल्यामुळे लोकल नेहमीच उशिरा धावतात. रेल्वे प्रशासनाने सिग्नल यंत्रणेकडे लक्ष दिले पाहिजे. - सुप्रिया भंडारी
एसी लोकल परवडत नाही-
कामाच्या वेळी प्रवास करताना जिवाची जोखीम पत्करून प्रवास करावा लागतो. एसी लोकलचे भाडे खर्चिक असल्याने त्या लोकल परवडत नाहीत. अशा वेळी लोकलची संख्या वाढली पाहिजे. एसी लोकलमुळे वेळ वाया गेल्यासारखे वाटते. एसीचे तिकीट परवडणारे हवे. साध्या लोकल सुरक्षित प्रवास करता येईल इतक्या संख्येने हव्यात.- रेखा गाडगे
महिला विशेष लोकलच्या फेऱ्या तुटपुंज्या-
गर्दीच्या वेळेसह अन्य वेळेतही प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. ४० लाखांहून अधिक प्रवासी संख्या असलेल्या मध्य रेल्वेत १३ लाखांहून अधिक महिला प्रवासी आहेत. या प्रवाशांच्या तुलनेत महिला विशेष लोकल फेऱ्या तुटपुंज्या असल्याची खंत आहे. गर्दीच्या वेळेत लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यात अक्षरश: चेंगराचेंगरीसारखी स्थिती असते. - शीतल कुराडे
पश्चिम आणि मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त इतर राज्यांतून नागरिक मुंबईमध्ये येतात. त्याचा भार लोकल ट्रेनवर येतो. प्रचंड गर्दी होत असतानाही नागरिक कधी ऑफिसला उशीर होईल म्हणून, तर कधी घरच्या ओढीने लोकलच्या दरवाजात लटकून धोकादायक प्रवास करत असतात. हा प्रवास अनेकांच्या जिवावर बेतत आहे.- राखी भिलारे
लोकलमधून पडून प्रवाशांचे मृत्यू होत असून, त्याला गाड्यांमधील गर्दीच कारणीभूत आहे. गर्दीचा रेटा कधी इतका वाढतो की, एका पंजात कसेबसे पकडून ठेवलेले हँडल निसटते आणि गाठ पडते ती थेट मृत्यूशीच. रेल्वेमार्गावर एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेगाड्यांमधून ये-जा करीत असतात. एखाद्या छोट्या देशाची लोकसंख्याही यापेक्षा कमी असेल. गाड्यांच्या फेऱ्या कमी असतात.- स्मिता मोरे