Join us  

महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:15 AM

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखत आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे.

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखत आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. त्यामध्ये ७२९ उपनगरीय ईएमयू कोचमध्ये ४४३२, तसेच वंदे भारतसह इतर ट्रेनच्या ४५६ डब्यांमध्ये २८२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १३५ ईएमयू रेकच्या लेडिज कोचमध्ये टॉकबॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे. या उपाययोजना राबविताना प्रामुख्याने महिला प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमृत स्थानक योजनेत मध्य रेल्वेवरील ९६ स्थानकांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी २० स्थानकांवर विकासकामे सुरू आहेत.

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ३०८ विशेष गाड्या चालवल्या आहेत. गणेशोत्सवासाठी एकूण २५८ विशेष गाड्या चालवण्याची योजना आहे.

नव्या सुविधा-

१) विविध स्थानकांवर २८ सरकते जिने आणि आणखी ३३ लिफ्ट बसवण्याची योजना आहे.

२) सुरक्षेचा उपाय म्हणून १८८ किलोमीटर ट्रॅकभोवती कुंपण उभारण्यात आले आहे.

३) १५६ स्थानकांवर सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत.

४) मान्सूनदरम्यान वॉटर प्रूफ एअर टाईट पॉइंट मशीन्सचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे पाणी साचल्यास पॉइंट बिघाड टाळता येईल आणि सिग्नल बिघाडाची प्रकरणे कमी होतील.

५) २०२३-२४ मध्ये दुहेरीकरण, नवीन मार्ग, मल्टी ट्रॅकिंग आदींचे ३४८ किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. २०२४-२५ साठी ५६० किलोमीटरचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २५.२६ किलोमीटर पूर्ण झाले आहे.

मध्य रेल्वेवर दररोज ३७४ मेल एक्स्प्रेस-

१) मध्य रेल्वे दररोज सरासरी ३७४ मेल-एक्स्प्रेस आणि १४५ पॅसेंजर-मेमू-डेमू गाड्या चालवते. यातून दररोज सरासरी ५.२ लाख प्रवासी प्रवास करतात.

२) मध्य रेल्वेने कलबुर्गी ते बंगळुरूदरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू केली असून या गाड्यांची संख्या ७ झाली आहे.

३) नवरात्री, दिवाळी, छटपूजा या सणांसाठी आणखी विशेष गाड्या चालवल्या जातील.

४) प्रवाशांना सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे १८१० उपनगरीय सेवा चालवते. यात ६६ एसी लोकल आहेत.

५) बेलापूर-उरण मार्गावर खारकोपर ते उरणपर्यंत उपनगरीय सेवा विस्तारित करण्यात आली आहे.

मुंबई विभागात पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स, परळ कोचिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड मेगा-टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचा विस्तार, नागपूर विभागातील गोधनी येथे कोचिंग कॉम्प्लेक्स, पुणे विभागातील उरुळी, ओढा, नाशिक येथे कोचिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजन आहे. भुसावळ विभागात आणि सोलापूर विभागातील टिकेकरवाडी, मुंबई विभागातील कल्याण, नागपूर विभागातील अजनी आणि पुणे विभागातील हडपसर येथे ३ नवीन कोचिंग टर्मिनल्सची योजना प्रगतिपथावर आहे. - राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेमहिला