‘बीडीडी’तील पात्र ठरलेल्या भाडेकरूंना एकरकमी भाडे; वरळीतील घरांसाठी आठवडाभरात लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:11 AM2024-06-17T10:11:13+5:302024-06-17T10:17:05+5:30
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या जुन्या चाळींमधील भाडेकरूंना ११ महिन्यांचे दरमहा भाडे एकत्रित देण्यात आले आहे.
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या जुन्या चाळींमधील भाडेकरूंना ११ महिन्यांचे दरमहा भाडे एकत्रित देण्यात आले आहे. आताही पुढच्या टप्प्यात त्यांना एक महिन्याऐवजी एकरकमी ११ महिन्यांचे भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे, तर वरळीत पुनर्विकासातून उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील सदनिकांच्या वाटपासाठी म्हाडाकडून आठवडाभरात संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी काढण्यात येणार आहे.
सध्या वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. पात्र निवासी गाळेधारकांना संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देऊन स्थलांतरित करण्यात येते. मात्र, म्हाडाकडे शिबिरातील गाळे अपुरे आहेत. त्यामुळे भाडेकरूंना भाडे घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. पात्र निवासी गाळेधारकांना संक्रमण शिबिर नको असेल, तर त्यांना त्यांच्या पर्यायानुसार दरमहा २५ हजार रुपये भाडे म्हाडाकडून दिले जाते. पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांमध्ये स्थलांतरित होईपर्यंत तिन्ही चाळींतील पात्र गाळेधारकांना हा निर्णय लागू असणार आहे.
स्वत:ची सोय करून राहत असलेल्या पात्र गाळेधारकांना एकरकमी ११ महिन्यांचे भाडे म्हाडातर्फे देण्यात येणार आहे.
प्रस्तावाला उपाध्यक्षांची मान्यता-
१) पुनर्विकास प्रकल्पातील तीनही चाळींतील असे निवासी व अनिवासी गाळेधारक ज्यांनी म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील गाळ्याचा पर्याय स्वीकारलेला नाही, अशा गाळेधारकांना म्हाडाकडून भाडे देण्यात येते.
२) सुरुवातीला ११ महिन्यांचे एकत्रित भाडे दिल्यानंतर प्रत्येक महिन्याचे भाडे देण्याऐवजी पुन्हा एकत्रित ११ महिन्यांचे भाडे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
३) या मागणीबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी प्रस्तावाला मान्यता दिली आहे.