लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम उपनगरातील वर्सोवा आणि उत्तर मुंबईतील मढला जोडणाऱ्या मढ-वर्सोवा खाडी पुलाचा खर्च १,९०० कोटी रुपयांनी वाढला आहे. मार्चमध्ये निविदा मागवण्यात आल्या, तेव्हा पुलाचा खर्च २,०३८ कोटी होता. एकूणच या प्रकल्पाची गती संथ असल्याने खर्चात वाढ झाली आहे. त्याशिवाय भविष्यातील दरवाढ लक्षात घेता ५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पुलाचा खर्च आता ३,९०० कोटींवर गेला आहे.
मढ-वर्सोवा खाडी पूल २.०६ किमी लांबीचा आहे. त्यात १५० मीटर, ३०० मीटर आणि १५० मीटरचे तीन विभाग असतील. ते केबल-स्टेड असतील. केबल टाकलेले भाग चार लेनचे असतील, तर उर्वरित पुलाचे भाग सहा लेनचे असतील. या पुलावरून वाहने प्रतितास १०० किमीच्या वेगाने जाऊ शकतील.
फेरी बोट सेवा रात्री बंद-
वर्सोवा कोळीवाड्याच्या बाहेरील बाजूने असलेल्या अमरांथ रोडजवळ हा पूल सुरू होईल आणि मढ जेट्टीवर संपेल. सध्या मढ आणि वर्सोवा दरम्यान एक फेरी बोट सेवा सुरू आहे, मात्र ती रात्री बंद असते.
परवानगीची प्रक्रिया सुरू-
१) मढ-वर्सोवा पूल २०१५ मध्ये पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आला होता आणि पाच वर्षांनंतर प्रकल्पाची अंतिम ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे ७०० कोटी होती.
२) मार्च २०२४ मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या होत्या. तेव्हा खर्च २,०३८ कोटींवर पोहोचला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सीआरझेड परवानगी मिळाली आहे. वनविभागाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.
वेळेत बचत-
१) या पुलामुळे मढ आणि वर्सोवा दरम्यान २४ तास कनेक्टिव्हिटी मिळेल. हा पूल ३६ महिन्यांत बांधणे अपेक्षित आहे.
२) सध्या मढ बेट-अक्ष गाव मालाडपासून शहराशी जोडले गेले आहेत, जे सुमारे १० किमी अंतरावर आहेत. पूल तयार झाल्याने, ही दोन गावे चार किमीच्या प्रवासाने शहराशी जोडली जातील.
३) अंधेरीहून मढ येथे रस्ता मार्गे अंतर १८ किमी असून, त्यासाठी किमान दीड तास लागतात. पुलामुळे आता त्यासाठी ७५ मिनिटे लागतील.