मुंबई : एसटी महामंडळाकडून ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ योजना १९८८ पासून प्रवाशांसाठी राबविली जात आहे. या योजनेतून वर्षभरात १२ कोटी २७ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आवडेल तिथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत १० दिवसांचा पास दिला जात होता. २३ एप्रिल २००६ पासून १० दिवसांच्या पासप्रमाणे ४ दिवसांचा पास दिला जात आहे. २ मे २०१० पासून १० दिवसांचे पास बंद करून त्याऐवजी ७ दिवसांचा पास देण्यात येत आहे. प्रवाशांच्या गरजेप्रमाणे योजनेत वेळोवेळी बदल गेले जात आहेत.
साध्या जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवेअंतर्गत ४ दिवसांच्या पाससाठी प्रौढांकरिता १,१७० रुपये तर शिवशाही (आसनी) आंतरराज्याकरिता १,५२० रुपये आकारले जातात. सात दिवसांच्या पाससाठी अनुक्रमे २,०४० व ३,०३० रुपये आकारले जातात. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मार्च २०२४ अखेर एकूण ८९,६३३ पासची विक्री झाली. त्यातून १ हजार २२६.७९ लाख उत्पन्न महामंडळास मिळाले आहे.
अशी आहे प्रक्रिया-
१) आंतरराज्य वाहतुकीसाठी एसटी सेवा जिथे जाते तेथे पास वैध राहतील.
२) योजनेतील सर्व प्रकाराचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील.
३) उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहतील.
४) पासची मुदत संपल्यावर परतावा देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.
५) स्मार्टकार्ड धारकाकडील स्मार्टकार्ड वाहकाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनला लावून स्मार्ट कार्डची वैधता तपासता येते. त्यानुसार, मशीनमध्ये प्रवाशाची नोंद होऊन प्रवाशास प्रवास करता येतो.