Join us  

धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:32 AM

सद्यःस्थितीत कैला जाणारा पात्र-अपात्रतेचा सर्व्हे बळाने केला जात असल्याने रहिवाशांनी तो हाणून पाडल्याचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आमचा विरोध नाही. विकासाला आम्ही कधीच विरोध केला नव्हता. आमचे केवळ एकच म्हणणे आहे, ते म्हणजे धारावीतील प्रत्येक रहिवासी हा पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र आहे. प्रत्येकाला धारावीतच घराला घर मिळाले पाहिजे. परंतु, सद्यःस्थितीत कैला जाणारा पात्र-अपात्रतेचा सर्व्हे बळाने केला जात असल्याने रहिवाशांनी तो हाणून पाडल्याचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या गोंधळाच्या मुद्द्यांवरून गायकवाड आणि अनिल देसाई यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी गायकवाड आणि देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गायकवाड म्हणाल्या की, धारावीमध्ये सद्यः स्थितीत फौजफाटा घेऊन सर्व्हे केला जात आहे. ज्यांना काही माहिती नाही, असे लोक सर्व्हे करत आहेत. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली 'अदानी'च्या घशात जमीन घालणे अयोग्य आहे. 

नियम बासनात?

धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे. अशी सर्व रहिवाशांची भूमिका असताना, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मिठागरे, जकात नाक्यासाठी वापरण्यात येणारी महापालिकेची जमीन, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन किंवा कुर्ला डेअरीची जमीन प्रस्थापित नियमांना बासनात गुंडाळून का दिल्या जात आहेत? असा सवालही करण्यात आला.

विशेष नागरी प्रकल्पाच्या निकषांनुसार सर्वांना पात्र ठरविणारा निर्णय होईपर्यंत सर्वेक्षण होऊ देणार नाही. स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन या सर्वेक्षणाला विरोध करण्याची व हे सर्वेक्षण बंद पाडण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहील. धारावीकरांच्या न्याय आणि रास्त मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. - अॅड. राजेंद्र कोरडे, समन्वयक, धारावी बचाव आंदोलन

मुळातच धारावीतील रहिवाशांना आहे तिथेच घर मिळाले पाहिजे. सगळ्यांना पात्र ठरवले पाहिजे. नाही तर आम्ही सर्व्हे करू देणार नाही. धारावीतील प्रत्येकाचे धारावीत पुनर्वसन झाले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.

टॅग्स :मुंबईवर्षा गायकवाडधारावीकाँग्रेस