मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदींबाबत जागृती करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राबवलेल्या पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता हा दुसरा टप्पा सोमवारपासून ४ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांनी यात सहभागी होऊन पारितोषिके मिळवावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' या योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात आला.
अभियानाची प्रमुख उद्दिष्टे-
विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करणे, तसेच शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे हे अभियानाचे उद्दिष्टे आहे. उपक्रमाचा दुसरा टप्पा ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, सहभागी होण्यासाठी शाळांना https://education.maharashtra. gov.in/school/users/login/4 या संकेतस्थळावर माहिती भरावी लागेल.