लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ‘मेकओव्हर’चे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या परिसराला डम्पिंग करून ठेवले आहे की काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
घाटकोपर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आरक्षण केंद्राच्या जागेवर नव्याने सरकते जिने, जिने आणि शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र शौचालयात पाणी नाही. जिन्यांच्या आसपास राडारोडा टाकण्यात आला आहे. तर उर्वरित परिसरात बांधकामाचे साहित्य पडले आहे. त्यामुळे सरकत्या जिन्यासह इतर जिन्यांचा वापर करताना अडचणी येत आहेत, असे रेल्वे प्रवासी संदीप पटाडे यांनी सांगितले.
विशेषत: सकाळी आणि सायंकाळी रेल्वेस्थानक आणि बाहेरील परिसरात मोठी गर्दी असते. अशावेळी रेल्वेस्थानकाच्या परिसरातील हा पसारा त्रासदायक ठरत असल्याचे रेल्वे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे.