Join us

मलबार हिल जलाशयाचे पुनर्परीक्षण होणार; आयआयटी रुरकी आणखी पर्याय सुचविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:32 AM

मलबार हिल जलाशयाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पालिका पुन्हा आयआयटी रुरकीची मदत घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मलबार हिल जलाशयाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पालिका पुन्हा आयआयटी रुरकीची मदत घेणार आहे. याआधी आयआयटी रुरकीकडून मलबार हिल जलाशयाला तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता नाही, असे सांगत नवीन टाकी बांधून टप्प्याटप्याने दुरुस्ती हाती घेता येईल, असे सुचविले होते. मात्र स्थानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते पर्यायी टाकी बांधून पालिका पैशांचा अपव्यय करत असल्याने त्यांनी यावर आक्षेप नोंदवला. दरम्यान, याऐवजी अंतर्गत तांत्रिकदृष्ट्या उपाय करून दुरुस्तीचा पर्याय सुचवून मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करता येईल का, याची चाचपणी पालिका रुरकीच्या सहाय्याने  करणार आहे.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रुरकीकडून अहवाल सादर केल्यानंतर रद्द केला. दरम्यान, जलाशयाच्या टप्प्या-टप्प्यांतील दुरुस्तीसाठी पर्यायी पाण्याची टाकी बांधून दुरुस्ती हाती घेण्याचे आयआयटीने सुचविले. 

मात्र पालिकेकडून आयआयटीला दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा पर्याय समोर आला असून, तो अनाठायी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली.  या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांची भेट घेत पर्यायी टाकी न बांधता जलाशयाच्या दुरुस्तीच्या पर्यायावर चर्चा केली. 

योग्य पर्यायाची निवड करणार -

आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांना पुनर्परीक्षणासाठी आणखी काही माहितीची आवश्यकता आहे. ती पालिका लवकरच पुरविणार आहे. या माहितीच्या आधारे दुरुस्तीच्या टप्प्यांतर्गत विविध टप्प्यांच्या प्रवाहात अडथळा न येता जलाशयाची दुरुस्ती करण्यासाठीचे तंत्रज्ञान आयआयटी पालिकेला सुचविणार आहे. मलबार हिल जलाशय आवश्यकतेनुसार सद्यस्थितीत ८० दशलक्ष लिटर भरले आहे. ही प्रक्रिया दिवसातून तीन वेळा होते. दरम्यान, तरीही टाकी अर्धी रिकामी असल्याने ती पूर्णतः भरण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो का? यावर आयआयटी पर्याय सुचविणार आहे. 

अहवालानंतर पालिकेकडून आधीच पर्यायी टाकी बांधण्याचा पर्याय आणि नवीन उपाय यात तुलना करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईनगर पालिका