Join us

मॅनहोल झाकण चोरांचे करायचे काय? नशेबाजांचा सहभाग; १ झाकण विकतात दोन हजारांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:49 AM

मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्यांमध्ये विशेषतः नशेबाजांचा विशेष सहभाग असतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईत २०१७ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील यकृतविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मॅनहोलच्या झाकणांच्या चोरीचा विषय गंभीर बनला. मात्र, अशी झाकणे चोरणाऱ्या भुरट्या चोरांना प्रतिबंध घालण्यात पालिका आणि पोलिसांना यश मिळालेले नाही. 

झाकण चोरांची कार्यपद्धती? 

मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्यांमध्ये विशेषतः नशेबाजांचा विशेष सहभाग असतो. निर्जनस्थळी तसेच कमी वर्दळीच्या ठिकाणी आणि सहज प्रवेश मिळेल, अशा ठिकाणची मॅनहोलची झाकणे हे चोरटे चोरतात. त्याकरिता ते दुचाकीचा वापर करतात. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी, टेम्पो किंवा कधी-कधी मोठमोठ्या ट्रकमध्ये भरूनही ती पळवली जातात. त्यानंतर त्याचे तुकडे केले जातात, कारण अख्खे झाकण विकताना पकडले जाण्याची भीती असते. ही झाकण दीड-दोन हजारांना विकली जात असल्याची माहिती आहे.

धातूचे रॉड, साखळ्यांचीही चोरी- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पालिकेने धातूच्या साखळ्या या झाकणांवर बसवल्या. त्यावेळी चोरांनी केवळ झाकण नाही, तर साखळ्या देखील पळवल्या. तसेच पालिकेने दुरुस्ती करताना उचलणे सोपे होईल त्यावर लावलेले लोखंडाचे रॉडही चोरांनी कालांतराने लंपास केले.

चोरीच्या काही घटना-

१)  ‘के पश्चिम’ विभागातून फेब्रुवारी २०२४ मध्ये ड्रेनेजवरील चार लोखंडी झाकणे पळवून नेण्यात आली. याप्रकरणी मलनिस्सारण प्रचालन निरीक्षक सहदेव परुळेकर यांनी जुहू पोलिसांत तक्रार दिली होती.

२)  दहिसरमध्ये मलनिस्सारण वाहिनीवरील तीन झाकणे व संरक्षक जाळी सप्टेंबरमध्ये चोरण्यात आली. त्याची किंमत १७ हजार ५०० रुपये असून, अधिकारी देवेंद्र वैद्य यांनी दहिसर पोलिसांत तक्रार दिली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाचोरी