मॅनहोल असुरक्षितच...! संरक्षक जाळ्यांचे काम ५० टक्केच पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:04 AM2024-05-25T10:04:17+5:302024-05-25T10:08:00+5:30
पावसाळ्यात रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलमध्ये कोणीही पडून दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिकेने त्यात नवीन संरक्षित जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे.
मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलमध्ये कोणीही पडून दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिकेने त्यात नवीन संरक्षित जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे. शहर व उपनगरात सुमारे ९४ हजार मॅनहोल असून, कामाच्या कासवगतीमुळे आतापर्यंत केवळ ४३ हजार ५८१ मॅनहोलवर संरक्षित जाळ्या बसवल्या आहेत. त्यामुळे उर्वरित मॅनहोलवर ३१ मे पर्यंत या जाळ्या बसवण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. मात्र न्यायालयाचे आदेश असल्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांनी मुदतीत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पावसाळ्यात जलवाहिन्यामध्ये कचरा तुंबून पूर परिस्थिती उद्भवू नये, म्हणून मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुरुवातीला त्याचा प्रोटोटाइप बनवण्यात आला. तर, आता या जाळ्या बसवण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दरम्यान, या जाळ्यांची खरेदी प्रक्रिया मध्यवर्ती खरेदी विभागामार्फत झाल्याने त्याच्या प्रक्रियेला विलंब झाला. परिणामी या जाळ्या बसवण्यासही उशीर झाला आहे.
नोटिसीआधीच सूचना-
पावसाळ्यात दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या घटना घडू शकतात. या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना ‘एस’ विभागाने सावधानतेच्या सूचना नोटिसीआधीच दिल्या आहेत.