अमर शैला,मुंबई : जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांमधील मरीनाच्या धर्तीवर मुंबईत नरिमन पॉइंट येथे समुद्रकिनारी मरीना प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रकल्पाचा अहवाल तयार केला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात विधान भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत सादरीकरण करण्यात आले आहे.
नरिमन पॉइंट येथील एनसीपीए थिएटरनजीक समुद्रात हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या नरिमन पॉइंट ते कफ परेड कनेक्टरला लागूनच हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
सिंगापूरच्या कंपनीकडून लवकरच पाहणी-
१) यापूर्वी मुंबईतील जलपर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पूर्व किनारपट्टीवर मरीना प्रकल्प उभारण्यात येणार होता.
२) प्रिन्सेस डॉक परिसरात हा मरीना प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी अपेक्षित प्रतिसाद कंत्राटदारांकडून मिळाला नसल्याने तो रखडला आहे.
३) आता त्याच धर्तीवर पश्चिम किनारपट्टीवरही हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे.
४) कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे नार्वेकर हे प्रतिनिधित्व करत असून, त्यांच्या मतदारसंघात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत.
५) दरम्यान, सिंगापूरस्थित कंपनीकडून या प्रकल्पाच्या सुसाध्यतेबाबत प्राथमिक पाहणी करण्याचे प्रस्तावित आहे, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी नरिमन पॉइंट ते कफपरेड दरम्यान पुलाची उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, त्यातून मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यामुळे मच्छीमारांना अडचण येऊ नये, यासाठी या मार्गात बदल केला असून, आता किनाऱ्यालगत रस्ता उभारला जाणार आहे. या रस्त्याला लागून मरीना उभारण्याचा विचार आहे. या मरीनात मनोरंजनाच्या गोष्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच मुंबईत पर्यटनाच्या संधीही निर्माण होतील. एमएमआरडीएकडून याचा आराखडा बनवला जाणार आहे.- राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
काय आहे मरीना?
छोट्या बोटी, याॅर्ट (शिडीची होडी), क्राफ्ट पार्किंगसाठी जागा असते. या ठिकाणाहून जलपर्यटनासाठी जाता येत असून त्यासाठी येथे सुविधा असते. तसेच रेस्टॉरंट, मनोरंजनाच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जातात. परदेशात समुद्रकिनाऱ्यांवर मरीना प्रकल्प उभारले असून, त्यातून पर्यटनाचा विकास केला आहे.
‘या’ मार्गात बदल -
१) सद्य:स्थितीत नरिमन पॉइंट येथून कफ परेड आणि कुलाब्याला जाण्यासाठी कॅप्टन प्रकाश पेठे हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
२) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नरिमन पॉइंट ते कफ परेड असा १.७ किमी लांबीचा दोन्ही दिशेला प्रत्येकी २ लेनचा सागरी सेतू उभारला जाणार होता. मात्र, त्याला मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
३) त्यामुळे या मार्गात बदल करण्यात आला असून, नरिमन पॉइंट येथून किनाऱ्याला लागून नवा मार्ग उभारला जाणार आहे. परिणामी, मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच कुलाबा आणि कप परेड येथील रहिवाशांनाही थेट कोस्टल रोडपर्यंत पोहोचता येणार आहे.